नवयुग पालघर
*दांडेकर महाविद्यालयात बंदर व्यवस्थापनाचा
भारतातील पहिलाच ‘बीबीए इन पोर्ट मॅनेजमेंट’ अभ्यासक्रम सुरू*
पालघर : पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक संलग्नित ‘बीबीए इन पोर्ट मॅनेजमेंट’ हा पदवी अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण भारतात अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम असून त्याला विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) मान्यता मिळाली आहे.इयत्ता बारावी (एचएससी) उत्तीर्ण विद्यार्थी या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. तसेच एसएससीनंतर किमान दोन वर्षांचा शासनमान्य डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थीही प्रवेशासाठी पात्र आहेत.
पालघर जिल्ह्याला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा, वाढते बंदरविकास प्रकल्प आणि सागरी व्यापाराच्या पार्श्वभूमीवर बंदर व्यवस्थापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाची संधी ठरणार आहे. वाढवण बंदराच्या विकासामुळे आगामी काळात बंदर व्यवस्थापन, सागरी व्यापार, वाहतूक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन (लॉजिस्टिक्स) क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण होण्याची शक्यता आहे.
हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. विशेष म्हणजे नियमित महाविद्यालयात अन्य पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही दुहेरी पदवी (ड्युअल डिग्री) अंतर्गत आपल्या नियमित पदवीसोबत हा अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.
अभ्यासक्रमात बंदर प्रशासन व संचालन, पुरवठा साखळी व्यवस्थापन, मालवाहतूक, शिपिंग व सागरी व्यापार, कंटेनर व्यवस्थापन यांसह आधुनिक व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
याशिवाय विद्यापीठाने रोजगाराभिमुख दोन स्वतंत्र प्रमाणपत्र अभ्यासक्रमही सुरू केले आहेत. त्यामध्ये ‘कस्टम्स क्लिअरन्स अँड फ्रेट डॉक्युमेंटेशन सुपरवायझर’ (C125) आणि ‘वेअरहाऊसिंग अँड इन्व्हेंटरी मॅनेजमेंट’ (C128) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. बंदर, शिपिंग, कस्टम्स, फ्रेट फॉरवर्डिंग, वेअरहाऊसिंग आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील वाढती मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन हे अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.
बंदर आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून करिअरची नवी दिशा मिळू शकते. अधिक माहितीसाठी केंद्र संयोजक डॉ. बी. बी. रहाणे (अभ्यास केंद्र कोड : ३५०२A, संपर्क : ९४०३०७७२९०) किंवा वाणिज्य विभागप्रमुख डॉ. मनीष देशमुख (९८२२४२६८१५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले आहे.