आरक्षणाच्या मागणीसाठी ४ सप्टेंबर रोजी वाड्यात रास्ता रोको***इतर मागासवर्गीय, अनु. जाती, भटक्या विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग (OBC, SC, NT, VJNT, SBC) व बिगर आदिवासी समाजघटकांना सहभागी होण्याचे आवाहन

Date: 2026-09-03
news-banner
नवयुग पालघर
****आरक्षणाच्या मागणीसाठी ४ सप्टेंबर रोजी वाड्यात रास्ता रोको****
**इतर मागासवर्गीय, अनु. जाती, भटक्या विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग (OBC, SC, NT, VJNT, SBC) व बिगर आदिवासी समाजघटकांना सहभागी होण्याचे आवाहन**

वाडा, दि. ३ सप्टेंबर : पालघर जिल्ह्यातील इतर मागासवर्गीय, अनु. जाती, भटक्या विमुक्त जमाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच इतर बिगर आदिवासी समाजघटकांचे नोकरीतील आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी आरक्षण हक्क बचाव समिती, पालघर-ठाणे जिल्ह्याच्या वतीने शुक्रवार, 
४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता वाडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सागर पेट्रोल पंपासमोर हे आंदोलन होणार असून जिल्ह्यातील संबंधित समाजघटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.

 पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासी समाजघटकांचे नोकरीतील आरक्षण शून्यावर आले असून, याविरोधात गेल्या १२ वर्षांपासून लढा सुरू आहे. या प्रश्नावर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून नोकरभरतीला स्थगिती मिळवण्यात आली होती.
दरम्यान, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच जिल्ह्यात स्थानिक उमेदवारांच्या नोकरभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ५० टक्के आरक्षणाचा लाभ केवळ आदिवासी समाजाला दिला जात असल्याने इतर आरक्षित प्रवर्गांचे आरक्षण शून्यावर आले आहे, असे समितीचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश सर्व आरक्षित प्रवर्गांची भरती करण्यासंदर्भात असल्याचा दावाही समितीने केला आहे.

या मागणीसाठी समितीने १३ ऑगस्टपासून लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानी आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू केला. १३ ऑगस्ट रोजी पालघर येथे आमदार राजेंद्र गावित यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर २१ ऑगस्टपासून खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या निवासस्थानी बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या धरणे आंदोलनाला दहा दिवस उलटूनही शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे समितीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर धरणे आंदोलनाच्या समर्थनार्थ वाडा येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे.
आपला संविधानिक आणि आरक्षणाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी सर्व संबंधित समाजघटकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आरक्षण हक्क बचाव समिती, पालघर-ठाणे जिल्ह्याने केले आहे.
navyugpalghar.com⁠
Facebook | Instagram | X | YouTube
#आरक्षणहक्क #आरक्षणहक्कबचाव #वाडा #पालघर #OBC #SC #NT #VJNT #SBC #आरक्षण #रास्तारोको #Palghar #NavyugPalghar

Leave Your Comments