आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी डहाणूतील आश्रमशाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN) बळकट करण्यासाठी विशेष जादा तासांचे आयोजन

Date: 2026-02-24
news-banner
नवयुग पालघर विशेष : 
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी डहाणूतील आश्रमशाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान (FLN) बळकट करण्यासाठी विशेष जादा तासांचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या NIPUN BHARAT (निपुण भारत) अभियानांतर्गत इयत्ता तिसरीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याने वाचन, लेखन आणि अंकगणितातील मूलभूत कौशल्ये आत्मसात करावीत, या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान म्हणजे विद्यार्थ्यांच्या पुढील शालेय शिक्षणाचा मजबूत पाया मानला जातो. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी विकास विभागाने Pratham या स्वयंसेवी संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार ‘प्रथम’ संस्था शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मूल्यमापन करते आणि ज्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त शैक्षणिक आधाराची गरज आहे, त्यांना विशेष मार्गदर्शन उपलब्ध करून देते. या पद्धतीला ‘टीचिंग अॅट द राईट लेव्हल’ (TaRL) असे संबोधले जाते.
‘प्रथम’ संस्था देशातील शिक्षणाची वास्तविक स्थिती दर्शविणारा ASER (असर) हा वार्षिक अहवाल प्रसिद्ध करण्यासाठीही ओळखली जाते. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शिकण्याच्या स्तरावर आधारित अध्यापन पद्धतीमुळे शिक्षणात गुणवत्तावाढ होत असल्याचे अनुभवातून दिसून आले आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) डहाणू अंतर्गत ५४ आश्रमशाळांमधील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांचे २७ जानेवारी २०२६ रोजी मूल्यमापन करण्यात आले. या चाचणीत विद्यार्थ्यांचा सरासरी गुणांक २० पैकी १५.१७ इतका नोंदविण्यात आला. काही शाळांनी २० पैकी २० गुण मिळवत उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली. एकूण निकालांवरून बहुतांश विद्यार्थी FLN ची उद्दिष्टे गाठत असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी काही विद्यार्थ्यांना अतिरिक्त शैक्षणिक सहाय्याची गरज असल्याचेही निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर संबंधित विद्यार्थ्यांसाठी शालेय वेळेनंतर ‘जादा तास’ (Remedial Classes) घेण्याच्या सूचना मुख्याध्यापक व शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. या तासांमध्ये लेखन, वाचन आणि संख्याज्ञानावर विशेष भर दिला जाणार आहे. ‘प्रथम’ संस्थेने विशेष तयार केलेले FLN संच (Kits) शाळांना वितरित करण्यात आले असून, खेळ व कृतीआधारित उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अक्षर, शब्द व संख्यांचे ज्ञान दिले जात आहे.
याशिवाय, इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हावा आणि त्यांची परीक्षेची तयारी सक्षम व्हावी, यासाठी उन्हाळी सुट्टीत ‘क्रॅश कोर्स’चे आयोजन करण्यात आले आहे.
या संपूर्ण उपक्रमाचा उद्देश दंडात्मक कारवाई नसून, विद्यार्थ्यांच्या सध्याच्या शैक्षणिक स्तराची अचूक माहिती शिक्षकांना मिळावी आणि प्रत्येक विद्यार्थ्याला अपेक्षित शैक्षणिक ध्येय गाठण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, हा आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उचललेले हे पाऊल सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरणार असल्याचा विश्वास खत्री यांनी व्यक्त केला आहे.

Leave Your Comments