दाभोसा स्काय वॉकचा मुहूर्त १५ ऑगस्टला; तोपर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी पावसाळ्यातील पर्यटन हंगामातच स्काय वॉक बंद;

Date: 2026-08-12
news-banner

नवयुग पालघर
***दाभोसा स्काय वॉकचा मुहूर्त १५ ऑगस्टला; तोपर्यंत पर्यटकांना प्रवेशबंदी
पावसाळ्यातील पर्यटन हंगामातच स्काय वॉक बंद;*** 

पालघर, दि. ११ ऑगस्ट : पालघर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ असलेल्या दाभोसा धबधब्यावरील स्काय वॉक पुलाचे उद्घाटन आता १५ ऑगस्ट २०२६ रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, उद्घाटनापूर्वी स्काय वॉकवर पर्यटकांना प्रवेश देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाळ्यात दाभोसा धबधब्याचा पर्यटन हंगाम ऐन बहरात असतानाच स्काय वॉक पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. परिणामी दाभोसाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचल्यानंतरही स्काय वॉकचा अनुभव न घेताच परतावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

१३ जून रोजी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी दाभोसा धबधब्याची पाहणी केली होती. त्यावेळी दाभोसा हे जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असल्याचे नमूद करत स्काय वॉक ग्लास ब्रिजसह परिसराच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या. सुमारे दोन कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाच्या स्काय वॉकसह वाहनतळ, तिकीट खिडक्या, प्रतीक्षा व्यवस्था, खाद्यपदार्थ केंद्र, निवारा व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि पर्यटकांसाठी मार्गदर्शन व्यवस्था उभारण्याचा विचारही त्यावेळी मांडण्यात आला होता.

या पाहणीनंतर काही काळ स्काय वॉकवर पर्यटकांची ये-जा सुरू होती. मात्र, त्यानंतर अचानक प्रवेश बंद करण्यात आला. आता १५ ऑगस्ट रोजी अधिकृत उद्घाटन होईपर्यंत प्रवेश पूर्णपणे बंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे जूनच्या मध्यापासून ऑगस्टच्या मध्यापर्यंतचा पावसाळी पर्यटनाचा महत्त्वाचा कालावधी पर्यटकांच्या हातातून निघून गेला आहे.

*दाभोसाला पोहोचूनही परतावे लागत असल्याची स्थिती*
पावसाळ्यात दाभोसा धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. धबधब्याचे पाणी, हिरवाई आणि परिसराचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येतात. मात्र, स्काय वॉक बंद असल्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचत नसल्याने काही पर्यटक प्रत्यक्ष दाभोसाला पोहोचल्यानंतर प्रवेश बंद असल्याचे समजल्यावर परतत आहेत. त्यामुळे पर्यटकांकडून  नाराजी व्यक्त होत आहे.
*उद्घाटनापूर्वी सुरक्षेवर भर*
६ ऑगस्ट रोजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत स्काय वॉकच्या सुरक्षेसह पर्यटनस्थळाच्या व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. कोणताही अपघात घडण्याची वाट न पाहता आवश्यक प्रतिबंधात्मक सुरक्षाव्यवस्था तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन वाहनतळ, लेन मार्किंग आणि गर्दीचे व्यवस्थापन १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. स्काय वॉकवर एकावेळी किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा, त्यांचा प्रवेश कालावधी आणि प्रवेश शुल्क याबाबतही नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वन विभागानेही पर्यटनस्थळी सक्रिय सहभाग घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, नियमित तपासणी करावी आणि गरजेनुसार वनरक्षकांची नियुक्ती करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.
*सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेशबंदी*
उद्घाटनापूर्वी काही नागरिकांना स्काय वॉकवर प्रवेश दिल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. अधिकृत उद्घाटन होईपर्यंत कोणालाही प्रवेश देऊ नये, अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधितांची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत.
*पावसाळी पर्यटनाचा हंगाम आणि नियोजनाचा प्रश्न*
सुरक्षेच्या दृष्टीने उद्घाटनापूर्वी प्रवेशबंदी करणे आवश्यक असले, तरी दाभोसासारख्या पावसाळी पर्यटनस्थळासाठी जून ते ऑगस्ट हा अत्यंत महत्त्वाचा पर्यटन काळ मानला जातो. त्यामुळे १३ जूनच्या पाहणीनंतर पर्यटकांची ये-जा सुरू झालेली असताना त्यानंतर प्रवेश बंद करण्याची वेळ का आली, तसेच स्काय वॉकचे काम, सुरक्षा तपासणी आणि व्यवस्थापनाचे नियोजन आधीच पूर्ण करून हा पर्यटन हंगाम पर्यटकांसाठी उपलब्ध करून देता आला असता का, हा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.


Leave Your Comments

Trending News