नवयुग पालघर
“शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे; मन आणि मेंदू सुदृढ ठेवण्यासाठी वाचन गरजेचे” – किरण येले
पालघर : “शरीरसौष्ठवासाठी व्यायामाची गरज असते, तसेच आपले मन आणि मेंदू सुदृढ होण्यासाठी वाचनाची गरज असते,” असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, कथाकार व पटकथाकार किरण येले यांनी केले. सोनोपंत दांडेकर कला, व्ही. एस. आपटे वाणिज्य आणि एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालय, पालघर येथे डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते ‘ग्रंथ, विद्यार्थी आणि वाचन संस्कृती’ या विषयावर बोलत होते. रा. हि. सावे ग्रंथालय आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वाचनामुळे व्यक्तीमध्ये बोलण्याचे धैर्य, आत्मविश्वास आणि प्रगल्भता निर्माण होते. उत्तुंग व्यक्ती घडण्यामागे वाचनाचा मोठा वाटा असतो. “प्रत्येक उत्तुंग व्यक्ती ही स्वतः एक ग्रंथ असते,” असे सांगत येले यांनी वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथ, ग्रंथालय आणि ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच विविध प्रकारचे साहित्य वाचून आपली विचारक्षमता आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी संस्थेचे विश्वस्त प्रा. अशोक ठाकूर यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी मांडलेली ग्रंथालयशास्त्राची पाच तत्त्वे आजच्या काळातही ग्रंथ, ग्रंथालय आणि वाचन संस्कृतीच्या वृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी, “पुस्तके आपल्याला प्रगल्भ बनवितात,” असे सांगितले. सर्वांगीण विकासासाठी भावनिक बुद्ध्यांक वाढविणे आवश्यक असून, व्यक्तीच्या भावविश्वाला समृद्ध करण्याचे महत्त्वपूर्ण काम ग्रंथ करीत असतात, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी सातत्याने वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ग्रंथपाल डॉ. शीला गोडबोले पाईकराव यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याचा आणि ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला.
यावेळी ग्रंथालयाच्या वतीने वर्षभर आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रम व स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दर्शना चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मराठी विभागप्रमुख प्रा. विवेक कुडू यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रा. हि. सावे ग्रंथालयातील सर्व कर्मचारी तसेच मराठी विभागाने विशेष परिश्रम घेतले.