नवयुग पालघर Navyug Palghar Weekly २४ ऑगस्ट :
वंदे भारत : पालघर पुन्हा दुलर्क्षित
मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेसला गुजरातमध्ये सलग चौथा नवा थांबा मिळाला असून, यावेळी तो नवसारी येथे देण्यात आला आहे. हा थांबा, वलसाडपासून अवघ्या ३९ किमी आणि सुरतपासून फक्त २९ किमी अंतरावर असून, यामुळे गुजरातमध्ये अल्पअंतरात तब्बल तीन ठिकाणी वंदे भारत थांबणार आहे. परंतु, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील १४० किमी लांब पट्टा मात्र कायम वंचितच राहिला आहे.
गेल्या तीन वर्षांत गुजरातमधील वापी, वलसाड, आनंद आणि नवसारी येथे थांबे मिळाले असताना, पालघर,डहाणू, बोईसरसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक व प्रवासी केंद्रांकडे रेल्वेने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, पालघर जिल्हा महसुलात व प्रवाशी संख्येत गुजरातच्या नव्या ठिकाणांपेक्षा पटींनी पुढे असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते असा आरोप स्थानिक प्रवासी संघटनांनी केला आहे.
“पालघरची मागणी नजरेआड करून गुजरातमध्येच नवे थांबे देणे म्हणजे उघडपणे पक्षपातीपणाच आहे. हे नियोजनाचे नव्हे तर राजकीय फायद्याचे निर्णय आहेत, असे प्रवासी कार्यकर्ते हिमांशु वर्तक यांनी सांगितले,अन्य कार्यकर्त्यांच्या मते, माहिती अधिकाराखालील आकडेवारीनुसार पालघरचा महसूल व प्रवासीसंख्या वलसाड-नवसारीपेक्षा कित्येकपट जास्त आहे, तरीही तेथील मागण्या धाब्यावर बसवल्या जात आहेत.
दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना पश्चिम रेल्वेने पायाभूत सुविधांचे मर्यादित स्वरूप हे कारण पुढे केले आहे. विरार-दहाणू विभागात लोकल व मालगाड्यांचा प्रचंड दबाव असल्याने सध्या वंदे भारत थांबणे कठीण असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. मात्र चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या जिल्ह्यात थांबे वाढवण्याचा पर्याय तपासला जाईल, असे अधिकार्यांनी म्हटले आहे.