नवयुग पालघर ३१.०८/०७.०९
तलासरीत मुक्त विद्यापीठाच्या १६व्या संपर्क सत्राचे उद्घाटन
कॉ.गोदावरी परुळेकर महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील १६व्या संपर्क सत्राचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ. भगवान राजपूत यांनी विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या कार्यपद्धतीचे महत्त्व पटवून सांगितले. सलग दोन वर्ष तलासरी केंद्र कॉपीमुक्त ठरल्याची आठवण करून देत ही परंपरा यापुढेही कायम ठेवण्यासाठी प्रत्येक विद्याथ्र्याने प्रामाणिकपणे अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षणासोबत समाजकारणाची जाण ठेवणे व व्यावहारिक दृष्टिकोन विकसित करणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी मार्गदर्शक म्हणून उपस्थित डॉ. अर्जुन होन यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यापीठ अभ्यासक्रमाची पुस्तके केवळ परीक्षा केंद्रित नसून व्यक्तिमत्त्व विकासासाठीही उपयुक्त ठरतात, असे,ते म्हणाले. प्रा. भास्कर गोतीस यांनी प्रास्ताविकातून तलासरी अभ्यास केंद्राच्या १६ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत प्रशासकीय माहिती सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. तुवर यांनी मानले.
या प्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व अभ्यासक उपस्थित होते.