नवयुग पालघर Navyug Palghar Weekly
२४ ऑगस्ट :
मुंबई–अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पाच्या स्फोटक कामांमुळे, पालघर तालुक्यातील जलसार गावातील घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश
मुंबई–अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पाच्या स्फोटक कामांमुळे जलसार गावातील अनेक घरांना नुकसान झाल्याच्या तक्रारींची दखल घेत, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी बाधित घरांचे त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून, या आधारे नुकसानभरपाई थेट एल अँड टी कंपनीमार्फत ग्रामस्थांना देण्यात येणार आहे.मागील आठवड्यात जलसार येथिल ग्रामस्थांनी गावातील अनेक घरांना तडे गेल्याची तक्रार केली.बुलेट ट्रेनच्या बोगद्यासाठी केल्या जात असलेल्या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणले.तदनंतर प्रशासनाने याची दखल घेतली.
नुकसानीची स्वतंत्र पडताळणी
ग्रामपंचायत जलसारच्या निवेदनानंतर आयोजित बैठकीत रिहॅब कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या संस्थेमार्फत घरांचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोबदला निश्चित करण्यासाठी हाच अहवाल आधार मानला जाणार आहे.
स्फोटकांवर नियंत्रणाचे निर्देश
बोगद्याचे काम करताना वापरण्यात येणार्या स्फोटकांचा वापर ग्रामस्थ व महसूल विभागाच्या देखरेखीखालीच करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी कंपनीला दिले.ग्रामस्थांचा विश्वास टिकविण्यासाठी ही उपाययोजना महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीस आमदार विलास तरे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण,प्रांत अधिकारी श्याम मदनुरकर, जलसार ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, एल अँड टी कंपनीचे अधिकारी व गावकरी उपस्थित होते.
ग्रामस्थांना आवाहन
“नुकसानग्रस्त घरांचे पारदर्शक सर्वेक्षण होणार आहे. या प्रक्रियेत ग्रामस्थांनी सहकार्य करावे, त्यातूनच नुकसानभरपाई लवकर मिळणे शक्य होईल,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले.