**पालघर नगरपरिषदेच्या २०२६-२७च्या ३०४ कोटीच्या अर्थसंकल्पास मंजूरी**

Date: 2026-03-08
news-banner
नवयुग पालघर Navyug Palghar Weekly

**पालघर नगरपरिषदेच्या २०२६-२७च्या 
३०४ कोटीच्या अर्थसंकल्पास मंजूरी**  

पालघर नगरपरिषदेने २७ फेब्रुवारी रोजीच्या आपल्या विशेष सभेत ३०४ कोटी ६७ लाख ३६ हजार २३ इतक्या जमेसह २८३ कोटी २९ लाख ५७ हजार ३५१ इतक्या एकूण खर्चाचा २०२६-२०२७ च्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली. याच सभेत २०२५-२६ च्या १५० कोटी ९० लाख ८१ हजार ४०२ जमेसह १३४ कोटी ९ लाख एक हजार ७३४ इतक्या खर्चाच्या सुधारित अर्थसंकल्पास देखील या सभेत मान्यता देण्यात आली.यात २०२६-२७ च्या आगामी वर्षात २१ कोटी ३७ लाख ७८ हजार ६७२ इतकी तर २०२५-२६ च्या येत्या मार्च अखेरीस १६ कोटी ८१ लाख ७९ हजार ६६९ इतकी शिल्लक अपेक्षित धरली आहे. 
अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष उत्तम घरत यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. तत्पूर्वी ३० जानेवारी रोजी स्थायी सभेत मांडलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने काही सुचवलेल्या सुधारणांना मान्यता दिल्यानंतर त्यानुसार बदलासह २०२६-२७ चा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प विशेष सभेत समोर ठेवण्यात आला. आगामी २०२६-२७ च्या वर्षांमध्ये महसुली जमा ५७ कोटी ३८ लाख ५६ हजार ३५५, तर भांडवली जमा २३० कोटी ४७ लाख अपेक्षित असून महसुली खर्च ४२ कोटी ६१ लाख ५७ हजार ३५१, तर भांडवली खर्च २४० कोटी ६८ लाख इतका अपेक्षित आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २०२५-२६ च्या चालू वर्षात आठ महिन्यात प्रत्यक्षातील एकूण जमा १०२ कोटी ७८ लाख ४७ हजार ७५१ इतकी आहे. मात्र उर्वरित चार महिन्यात निम्मे म्हणजेच ४८ कोटी १२ लाख ३३ हजार ६५१ इतकी रक्कम अपेक्षित जमा धरली आहे. खर्चाच्या बाबतीत देखील आठ महिन्यात ८६ कोटी २० लाख ६ हजार १६० इतका प्रत्यक्षात खर्च आहे. तर येत्या चार महिन्यात हा खर्च ४७ कोटी ८८ लाख ९५ हजार ५७४ इतका अपेक्षित धरला आहे. 
२०२६-२७ ह्या आगामी वर्षातील अपेक्षित जमा आणि खर्च देखील आधीच्या वर्षाची प्रत्यक्षातील आकडेवारी पाहता वास्तववादी नसल्याचे दिसून येते. नगरपरिषदेने दिलेल्या २०२२-२३ मधील १३५ कोटी २० लाख ८३ हजार ५२७ ; २०२३-२४ मध्ये २२० कोटी एक लाख १८ हजार ९०६ तर २०२४-२५ मध्ये १२३ कोटी ९३ लाख ६८ हजार १८२ या तुलनेत २०२६-२७ मध्ये तब्बल ३०४ कोटी ६७ लाख ३६ हजार २३ इतकी जमा अपेक्षित धरली आहे. अपेक्षित भांडवली जमा २३० कोटी ४७ लाख इतकी दर्शवल्याने जमेची वास्तवाशी फारकत झालेली दिसते. 
२०२२-२३ मध्ये भांडवली जमा ३४ कोटी १५ लाख ७८ हजार ४०९;  २०२३-२४ मध्ये ७२ कोटी ३२ लाख ९५ हजार १६८ ; २०२४-२५ मध्ये ६२ कोटी ८९ लाख ८६ हजार ७२३ ; २०२५-२६ मध्ये ७७ कोटी ४६ लाख ५८ हजार ३७७ इतकी आहे. तर २०२६-२७ ची भांडवली जमा तब्बल २३० कोटी ४७ लाख इतकी दर्शवलेली आहे. भांडवली खर्चदेखील २०२६-२७ मध्ये २४० कोटी ६८ लाख इतका दर्शविलेला आहे. एका बाजूने विशिष्ट प्रयोजना करता अनुदाने अंशदाने या भांडवली जमातील तरतुदीद्वारा १४९ कोटी ४० लाख, प्राप्त ठेवी व शासनाच्या वतीने वसुली १५ कोटी ५३ लाख, इतरदायित्व नवीन योजनाना मिळणारी अनुदाने ६५ कोटी ५३ लाख अशी अपेक्षित भांडवली जमा दर्शवलेली आहे तर दुसर्‍या बाजूने वैशिष्ट्‌य पूर्ण अनुदानातून कामे ३० कोटी,विशेष वैशिष्ट्‌यपूर्ण अनुदानातून कामे ३० कोटी,नवीन पाणीपुरवठा योजना ३० कोटी अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.

Leave Your Comments