नवयुग पालघर विशेष : *पालघर जिल्ह्यातील ९ आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय मानांकन*

Date: 2026-02-24
news-banner
नवयुग पालघर विशेष : 
*पालघर जिल्ह्यातील ९ आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय मानांकन*

पालघर जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून जिल्ह्यातील ९ आयुष्मान आरोग्य मंदिर व प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके अंतर्गत राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. रुग्णकेंद्रित, सुरक्षित आणि शिस्तबद्ध आरोग्य सेवा देण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित मानले जात आहे.
जिल्हा गुणवत्ता आश्वासन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे संपन्न झाली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, आरएमओ डॉ. योगेश सुराळकर, डीआरसीएचओ डॉ. वैदही माळवी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन वाघमारे, जिल्हा नोडल अधिकारी तथा प्रभारी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रांजली सावे तसेच सर्व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
र्‍ैंAए म्हणजे काय?
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके (र्‍ैंAए) हा  भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयामार्फत राबविण्यात येणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या अंतर्गत आरोग्य संस्थांमधील सेवा गुणवत्ता, औषध व साधनसामग्री व्यवस्थापन, रुग्ण तपासणी प्रक्रिया, रुग्ण समाधान, स्वच्छता व सुरक्षितता यांचे केंद्रीय समितीद्वारे सखोल मूल्यमापन करून मानांकन दिले जाते. राष्ट्रीय मानांकनाची प्रमाणपत्रे संबंधित आरोग्य संस्थांना जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना, “हे मानांकन केवळ गुणांचे मोजमाप नसून रुग्णकेंद्रित, सुरक्षित व शिस्तबद्ध आरोग्य सेवा देण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण आणि सामूहिक प्रयत्नांचे फलित  तसेच जिल्ह्यातील आरोग्य सेवा राष्ट्रीय दर्जाची प्रतीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.” मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी  आदिंनी जिल्हास्तरीय गुणवत्ता पथकाचे  विशेष कौतुक केले.
या यशामध्ये तत्कालीन डीआरसीएचओ डॉ. सागर पाटील, तत्कालीन तालुका आरोग्य अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (जव्हार) डॉ. किरण पाटील तसेच डॉ. प्रांजली सावे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या उल्लेखनीय यशासाठी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक तसेच आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधितांचे अभिनंदन करत भविष्यातही गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय मानांकन प्राप्त केंद्रे
जामसर, नांदगाव, साकुर, साखरशेत  (जव्हार); तलवाडा (विक्रमगड) ; भाताणे (वसई) ; आमगाव (तलासरी) ; घोलवड (डहाणू) ; याशिवाय, आयुष्मान आरोग्य मंदिर न्याहाळे खुर्द (ता. जव्हार) या संस्थेलाही राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, आकांक्षित तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या जव्हार तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळाले असून असा मान मिळवणारा तो जिल्ह्यातील एकमेव तालुका ठरला आहे.
तसेच डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सामवन यांनी राष्ट्रीय मानांकनासाठी अर्ज सादर केला आहे. जिल्ह्यातील अन्य २३ आयुष्मान आरोग्य मंदिरांना राज्यस्तरीय मानांकन प्राप्त झाले आहे.

Leave Your Comments