नवयुग पालघर
***पालघर बसस्थानकाचा बारामतीच्या धर्तीवर विकासाचा प्रस्ताव
आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते पाच ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचे अनावरण***
पालघर : पालघर आगाराच्या ताफ्यात पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांचा समावेश करण्यात आला. या बसगाड्यांचे अनावरण सोमवार, १० ऑगस्ट रोजी पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन बसगाड्यांमुळे पालघर परिसरातील ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि आरामदायी बससेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला पालघर नगराध्यक्ष उत्तम घरत, रोहित गावित, नगरसेवक जस्विन घरत, विभागीय वाहतूक अधिकारी रोहिणी ठाकरे, अमीन तडवी, सोळंकी, कार्यशाळा अधीक्षक माणिक गायकवाड, राजू पाटील, संघटना विभागीय सचिव अर्शद चुनेवाला, नकुल पाटील यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार राजेंद्र गावित यांनी पालघर बसस्थानकाच्या प्रस्तावित विकासाची माहिती दिली. पालघर बसस्थानकाचा बारामतीच्या धर्तीवर आधुनिक आणि सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज बसस्थानक म्हणून विकास करण्यात यावा, अशी आपली भूमिका असून, त्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पालघर शहर आणि परिसरातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकातील पायाभूत सुविधा, प्रवाशांसाठी आवश्यक सोयी तसेच वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर बसस्थानकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे गावित यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पालघर आगारात दाखल झालेल्या पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बसगाड्यांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांसह शहरातील प्रवाशांनाही या बससेवेचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.