नवयुग पालघर :
**खरीप हंगामासाठी खत व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध; शेतकऱ्यांनी मिश्र व सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा – कृषी विभाग**
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खत व बियाण्यांचा पुरेसा पुरवठा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाल्याचा दावा करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी केवळ युरियावर अवलंबून न राहता मिश्र खते आणि सेंद्रिय खतांचा अधिक वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यासाठी जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची कार्यशाळा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेत खरीप हंगामासाठी खतसाठा, बियाणे उपलब्धता, खतांचे योग्य विनियोजन तसेच शेतकऱ्यांना वेळेत कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी यांनी पालघर जिल्ह्यास मंजूर खतसाठ्याचा सुयोग्य वापर करण्याच्या सूचना दिल्या.
चौकट ://सध्या जिल्ह्यात ९३० मेट्रिक टन इतका युरियाचा संरक्षित साठा उपलब्ध असून खुल्या बाजारातही ३१० मेट्रिक टन युरिया उपलब्ध आहे. तसेच १२८० मेट्रिक टन इतर मिश्र खतांचा साठाही शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.//
खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात युरिया व इतर खते उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय विविध प्रकारच्या भात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व निविष्ठा विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांना बियाण्यांचे वितरण करण्यात येणार असल्याचेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात भात हे प्रमुख पीक असून नाचणी व इतर पिकांचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या पार्श्वभूमीवर जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन आवश्यक असल्याचे कार्यशाळेत नमूद करण्यात आले.
शेतकऱ्यांनी केवळ नत्रजन्य खतांवर भर न देता मिश्र खते, सेंद्रिय खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर वाढविल्यास उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल, असेही मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेस पालघर ॲग्रो डीलर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आशिष पाटील, उपाध्यक्ष रणधीर पाटील, जिल्ह्यातील खते, बी-बियाणे व कीटकनाशके विक्रेते, मोहीम अधिकारी आदित्य रावुळ, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक प्रदीप बारामते, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी (गुण नियंत्रण), पंचायत समिती स्तरावरील कृषी अधिकारी तसेच निवडक शेतकरी उपस्थित होते.