जुनीच मोहीम, नवे आवाहन; ‘स्टॉप डायरिया’वर प्रशासनाचा तोच फॉर्म्युला

Date: 2026-07-04
news-banner
जुनीच मोहीम, नवे आवाहन; ‘स्टॉप डायरिया’वर प्रशासनाचा तोच फॉर्म्युला

पालघर जिल्ह्यात “स्टॉप डायरिया” अभियान राबविणार
पावसाळ्यात अतिसारावरील जनजागृतीला चालना

/जिल्हा परिषद पालघरचे दिनांक २५. ०६.२०२५ रोजीचे प्रसिध्दी पत्रक/

पालघर जिल्ह्यात १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत “स्टॉप डायरिया” अभियान राबविण्यात येणार असून, पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर अतिसारासारख्या जलजन्य आजारांवरील प्रतिबंधात्मक उपायांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे पावसाळ्यात डायरिया, गॅस्ट्रो व कावीळसारखे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जिल्हा परिषदमार्फत नागरिकांमध्ये योग्य स्वच्छतेच्या सवयी, ओआरएस आणि झिंक वापराविषयी जागरुकता वाढवण्यासाठी या मोहिमेची आखणी करण्यात आली आहे.  
या अभियानाची जिल्हास्तरीय कार्यदल सभा मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद पालघर येथे पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंखे, जिल्हा प्रजनन व बालसंगोपन अधिकारी डॉ. सागर पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड आणि सर्व तालुक्यांचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.  
         या मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वर्षांखालील बालकांमध्ये अतिसाराचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. अतिसार झालेल्या बालकांना ओआरएसचे पाकीट व झिंकच्या गोळ्या मोफत वितरित केल्या जाणार आहेत. तसेच अंगणवाडी केंद्र, शाळा व आरोग्य केंद्रांमध्ये ओआरएस घोळ तयार करण्याचे तसेच हात धुण्याचे प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत. यासह आरोग्य संस्थांमध्ये ‘ओआरएस कॉर्नर’ उभारण्यात येणार असून, जलशुष्कतेने बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार केले जातील, अशी माहिती डॉ. सागर पाटील यांनी दिली.  
      अतिसारावर मात करण्यासाठी वैयक्तिक आणि परिसरातील स्वच्छता आवश्यक आहे. उघड्यावर शौचास जाणे, उघड्यावर विकले जाणारे अन्न खाणे, अशुद्ध पाणी पिणे व जेवणाआधी तसेच शौचानंतर हात न धुणे यामुळे अतिसाराचा प्रादुर्भाव होतो. या पाश्र्वभूमीवर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड यांनी सांगितले की, ओआरएसचा घोळ आणि झिंकच्या गोळ्यांचा वापर केल्याने जलशुष्कता कमी होते व अतिसार लवकर आटोक्यात येतो. स्तनपान करणार्‍या मातांनी अतिसार चालू असतानाही बाळाला स्तनपान चालू ठेवावे व हलके, स्वच्छ अन्न द्यावे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.  
           या मोहिमेदरम्यान गाव पातळीवर विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार असून, स्वच्छतेचे महत्त्‌व पटवून देण्यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न केले जातील. “अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएसची घेऊनी साथ” या घोषवाक्याखाली ही मोहीम राबवली जाणार असून, नागरिकांनी अतिसाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. संतोष चौधरी यांनी केले.  
   मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी यावेळी नागरिकांना स्वच्छ आणि उकळून थंड केलेले पाणी पिण्याचे आवाहन करत, पावसाळ्यातील आजारांपासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाय महत्त्‌वाचे असल्याचे स्पष्ट केले.

’**स्टॉप डायरिया’ अभियानाला सुरुवात;
१६ जून ते ३१ जुलै दरम्यान जिल्हाभर जनजागृती **

/जिल्हा परिषद पालघरचे दिनांक १६. ०६.२०२६ रोजीचे प्रसिध्दी पत्रक/

बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच अतिसार (डायरिया) आजारामुळे होणारे मृत्यू टाळण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद पालघरच्या आरोग्य विभागामार्फत १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत जिल्हाभर ’स्टॉप डायरिया अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत पाच वर्षांखालील बालकांमध्ये अतिसाराचा प्रतिबंध, वेळेवर उपचार आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार आहे.  
अतिसारावर करा मात, स्वच्छता व ओआरएसची घेऊनी साथ हे या अभियानाचे घोषवाक्य असून जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, अंगणवाडी केंद्रे तसेच आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे.  
         अभियानादरम्यान अतिसार झालेल्या प्रत्येक बालकाला तात्काळ ओआरएस द्रावण व झिंक गोळ्या उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांचा योग्य वापर करण्याबाबत पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच घरभेटी, ग्रामसभा, शाळा व अंगणवाडी स्तरावरील जनजागृती कार्यक्रम, स्वच्छता व सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत प्रबोधन, हात धुण्याचे महत्त्‌व तसेच स्तनपान व पूरक आहाराबाबत माहिती देण्यात येणार आहे.  
        जिल्ह्यातील सुमारे १ लाख ५६ हजार २८३ पाच वर्षांखालील बालकांपर्यंत या अभियानाचा लाभ पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आरोग्य कर्मचारी तसेच विविध स्तरांवरील अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सक्रिय सहभाग घेणार आहेत.  
           अतिसाराची लक्षणे दिसताच उपचारासाठी जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. वैदेही माळवी यांनी केले आहे. अतिसार झाल्यास बालकाला भरपूर द्रवपदार्थ, ओआरएस द्रावण व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झिंक गोळ्या द्याव्यात, स्तनपान सुरू ठेवावे आणि निर्जलीकरणाची लक्षणे दिसल्यास तातडीने नजीकच्या आरोग्य केंद्रात दाखल करावे, असे त्यांनी सांगितले.  
          जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पाच वर्षांखालील बालकांचे अतिसारापासून संरक्षण करण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात, सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर करावा आणि ’स्टॉप डायरिया’ अभियानात सक्रिय सहभाग घेऊन बालकांच्या आरोग्य संरक्षणासाठी सहकार्य करावे.

/अतिसारमुक्त बालपणासाठी जिल्हा परिषद पालघरकडून दरवर्षीप्रमाणे ‘स्टॉप डायरिया’ अभियान राबवले जात आहे. यात २०२५मधील मोहीमेतील उद्दिष्टये आणि यंदाच्या घोषणांमध्ये फारसा फरक दिसत नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या मोहिमेचा परिणाम,आकडेवारी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याची माहिती मिळायला हवी.//या मोहिमेला चक्क स्टॉप डायरीया कॅम्पेन असे नाव दिले आहे.. ग्रामीण व आदिवासी भागासाठी प्राधान्याने ही मोहीम असेल तर इंग्रजीतील शब्दांचा वापर कितपत उचित आहे.. अतिसार किंवा जुलाब असे परिचित शब्द असताना इंग्रजीचा अट्टाहास का, हा देखील प्रश्न आहे...//हेही सांगायला हवे
२०२५-२०२६ मग फरक काय ?
मागील वर्षी किती रुग्ण ?
किती बालकांना ओआरएस दिले?
मृत्यू दर कमी झाला का ?
यंदा मोहिमेचे वेगळेपण काय ?/

Leave Your Comments