धानीवारी अपघात मदतप्रकरणी एकाच मदतीचे तीनवेळा वितरण ?

Date: 2026-07-04
news-banner
नवयुग पालघर

**धानीवारी अपघात मदतप्रकरणी एकाच मदतीचे तीनवेळा वितरण ?**

            डहाणू तालुक्यातील धानीवारी येथे १८ मे २०२६ रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत देण्यात आल्याचा दावा प्रशासनाने आणि सरकारने वेगवेगळ्या तारखांना पुन्हा पुन्हा केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
         २२ मे २०२६ रोजी पालघर जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात “आजअखेर सर्व १३ बाधित कुटुंबांना ही मदत वितरित करण्यात आली आहे,” असे स्पष्ट नमूद करण्यात आले होते. म्हणजेच केवळ चार दिवसांत मदत वाटप पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता.
        मात्र त्यानंतर २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या दुसर्‍या पत्रकात पुन्हा मुख्यमंत्री सहायता निधीतून १३ मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये, अशी एकूण ६५ लाखांची मदत वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. म्हणजे २२ मे रोजीच वाटप पूर्ण झाल्याचा दावा असताना पुन्हा २५ मे रोजी त्याच मदतीचे वितरण झाल्याचे कसे सांगितले गेले, हा पहिला प्रश्न उपस्थित झाला.
           याच प्रकरणात २५ जून २०२६ रोजी प्रसिद्धीा दिलेल्या तिसर्‍या पत्रकात मृतांची वाढलेली संख्या ( १३ वरून १४) दर्शविण्यात आली. साहजिकच सदर मृत(१) कुटुंबाला मदत देणे अपेक्षित होते मात्र येथेही मुख्यमंत्री सहायता निधीतून १४ लाभार्थ्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये, अशी एकूण ७० लाखांची मदत वितरित केल्याचे नमूद करण्यात आले आहे .
        या तीन प्रसिद्धीपत्रकांतील आकडेवारी पाहता स्पष्ट विसंगती समोर येतात. म्हणजे प्रत्यक्षात मदत एकदाच झाली की तीनदा, असा संभ्रम निर्माण झाला आहे.
         किंबहुना प्रत्यक्ष मदतीपेक्षा तिच्या वारंवार प्रसिध्दीवर अधिक भर दिला जात असल्याची चर्चा सुरु आहे.

Leave Your Comments