ठाणे - पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे बिगुल

Date: 2026-06-07
news-banner
नवयुग पालघर 

**ठाणे - पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे बिगुल**

 महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर ठाणे-पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून १ जूनपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अर्जांची छाननी होणार असून निर्धारित तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
            यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्‌य म्हणजे ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अद्याप झालेल्या नसल्याने या संस्थांचे सदस्य मतदार म्हणून सहभागी होणार नाहीत. त्यामुळे केवळ महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे लोकप्रतिनिधी मतदान करणार आहेत. परिणामी या निवडणुकीत शहरी भागातील राजकीय समीकरणांना विशेष महत्त्‌व प्राप्त झाले आहे.
          सध्या उपलब्ध आकडेवारीनुसार ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विविध महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींमधील एकूण १०७३ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यापैकी पुरुष ५११ तर महिला ५६२ सदस्यांचा समावेश आहे.
             मतदारसंख्येच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिका सर्वाधिक प्रभावशाली असून येथे १३१ सदस्य आहेत. त्याखालोखाल कल्याण-डोंबिवलीे महानगरपालिका (१२२), नवी मुंबई महानगरपालिका (१२१), वसई-विरार महानगरपालिका (११५) आणि भिवंडी-निजामपूर महानगरपालिका (९०) या महत्त्वाच्या संस्था आहेत. पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार तसेच इतर नगरपरिषद व नगरपंचायतींची मतेही निर्णायक ठरणार आहेत.
           राजकीय पातळीवर या मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदारसंख्या तुलनेने मर्यादित असल्याने प्रत्येक नगरसेवकाचे मत महत्त्वाचे ठरणार असून पक्षांकडून मतदारांची बांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे.
प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांची मतदारसंख्या
एकूण मतदार : १,०७३ (पुरुष ५११, महिला ५६२)
         या पाश्र्वभूमीवर ठाणे-पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक राज्यातील महत्त्वाच्या राजकीय लढतींपैकी एक ठरणार असून सर्वांचे लक्ष उमेदवार निवडीकडे लागले आहे.

Leave Your Comments