नवयुग पालघर
**वन विभागाच्या पुढाकारातून बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग प्रकल्प मंजूर; शेतकर्यांना स्थिर बाजारपेठ, युवकांना रोजगार आणि गावाला आर्थिक बळकटीचा दावा**
पालघर तालुक्यातील बहाडोली हे गाव जांभूळ उत्पादनासाठी ओळखले जाते. गावातील सुमारे ६० ते ७० टक्के शेतकर्यांचे अर्थकारण जांभूळ शेतीवर अवलंबून आहे. मात्र, हंगामाच्या सुरुवातीला चांगला दर मिळणार्या जांभळाला हंगामाच्या अखेरीस भावघसरणीचा फटका बसतो. बाजारातील चढ-उतार, नैसर्गिक आपत्ती आणि मागणी-पुरवठ्यातील असमतोलामुळे शेतकर्यांना अनेकदा आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या समस्यांवर दीर्घकालीन उपाय म्हणून वन विभागाने बहाडोली येथे ‘जांभूळ प्रक्रिया उद्योग प्रकल्प’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.
राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या विशेष प्रयत्नांतून हा प्रकल्प मंजूर झाला असून, जांभूळ उत्पादनाला मूल्यवर्धनाची जोड देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न यातून करण्यात येत आहे.
ग्रामसभेत प्रकल्पाची माहिती :
बहाडोली ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित ग्रामसभेत पालघर वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) सुशील नांदवटे यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती ग्रामस्थांसमोर मांडली. यावेळी संबंधित वनपाल, वनरक्षक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सचिव आणि ग्रामस्थ उपस्थित होते. आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आली असली तरी उपस्थित ग्रामस्थांना प्रकल्पाची उद्दिष्टे, अंमलबजावणी प्रक्रिया आणि अपेक्षित लाभ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
शेतकर्यांकडून थेट खरेदी, हमीची बाजारपेठ
या प्रकल्पाचा केंद्रबिंदू म्हणजे शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनासाठी स्थिर आणि विश्वासार्ह बाजारपेठ उपलब्ध करून देणे. उद्योगामार्फत जांभळाची
थेट खरेदी केली जाणार असून खरेदी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखली जाणार आहे. शेतकर्यांना कोणतीही थकबाकी न ठेवता नियमानुसार मोबदला दिला जाणार असल्याने दलालांवरील अवलंबित्व कमी होऊन उत्पादकांना थेट फायदा मिळणार आहे.
जांभूळ हे अत्यंत पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असलेले फळ मानले जाते. त्यापासून विविध प्रक्रिया उत्पादने तयार करून बाजारात विक्री केल्यास त्याचे मूल्य अनेक पटींनी वाढू शकते. त्यामुळे केवळ कच्च्या फळांच्या विक्रीवर अवलंबून राहण्याऐवजी मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून शेतकर्यांना अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
अत्याधुनिक सुविधा असलेला उद्योग:
सुमारे ६ हजार ते ८ हजार चौरस फूट क्षेत्रात उभारण्यात येणार्या या उद्योगात जांभूळ प्रक्रिया, ग्रेडिंग, उत्पादन निर्मिती, पॅकिंग आणि साठवणूक यासाठी अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. उद्योगाच्या कार्यक्षमतेसाठी तज्ज्ञ, तंत्रज्ञ आणि कुशल मनुष्यबळाची नियुक्ती केली जाणार असून त्यांचे मानधन कंपनीमार्फत दिले जाणार आहे.
उद्योग उभारणीपासून ते नियमित संचालनापर्यंत स्थानिक युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यास आणि युवकांना गावातच रोजगार मिळवून देण्यास हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
व्यावसायिक व्यवस्थापनाची योजना:
उद्योगाचे व्यवस्थापन सुरुवातीच्या पाच वर्षांसाठी अनुभवी आणि पात्र संस्थेकडे सोपविण्यात येणार आहे. फूड लायसन्स, प्रिझर्व्हेटिव्ह्ज, कंपनी कायदा, कामगार कायदे, विपणन व्यवस्था तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी यांचा विचार करून उद्योगाचे व्यावसायिक पद्धतीने संचालन केले जाणार आहे. उद्योग स्थिर झाल्यानंतर आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती सक्षम झाल्यास व्यवस्थापन हस्तांतरणाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
ग्रामस्थांच्या देखरेखीखाली उद्योग:
उद्योगाच्या कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी ग्रामसभेमार्फत स्वतंत्र समन्वय व देखरेख समिती स्थापन करण्यात येणार आहे. उद्योगाचा मासिक प्रगती अहवाल आणि आर्थिक व्यवहारांची माहिती नियमितपणे संयुक्त वनव्यवस्थापनमितीकडे सादर केली जाईल. तसेच दरवर्षी ग्रामसभेत उद्योगाच्या कामकाजाचा लेखी अहवाल मांडण्यात येणार आहे.
प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी ताळेबंद तयार करून निव्वळ नफ्याचे शासन नियमांनुसार वाटप केले जाईल.संयुक्त वनव्यवस्थापन समितीस मिळणारा हिस्सा गावाच्या विकासासाठी वापरण्यात येणार असून ग्रामसभेच्या ठरावानुसार ग्रामपंचायतीमार्फत विविध विकासकामे राबविली जाणार आहेत.
ग्रामीण विकासाचा आदर्श ठरण्याची क्षमता:
जांभूळ उत्पादक शेतकरी, स्थानिक युवक आणि संपूर्ण गावाला केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात येणारा हा प्रकल्प ग्रामीण मूल्यवर्धन उद्योगाचा आदर्श नमुना ठरू शकतो. शेतमालाला योग्य बाजारपेठ, रोजगारनिर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना आणि ग्रामविकासासाठी निधी अशा अनेक पातळ्यांवर या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम होणार आहे.
याबाबत बोलताना पालघर वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) सुशील नांदवटे म्हणाले, “बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग प्रकल्पामुळे जांभूळ उत्पादक शेतकर्यांना स्थिर बाजारपेठ, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी आणि गावाच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने हा प्रकल्प राज्यातील एक आदर्श ग्रामीण मूल्यवर्धन उद्योग म्हणून विकसित करण्यासाठी वन विभाग कटिबद्ध आहे.”
ग्रामसभेत प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिल्याबद्दल उपसरपंच राहुल पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने वन विभागाच्या अधिकार्यांचे आभार मानले. तसेच ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.