हर घर जल’च्या घोषणेला तडा; मोखाडा -जव्हारच्या आदिवासींची घोटभर पाण्यासाठी वणवण

Date: 2026-06-10
news-banner
नवयुग पालघर 

**हर घर जल’च्या घोषणेला तडा; मोखाडा -जव्हारच्या आदिवासींची घोटभर पाण्यासाठी वणवण**

             राज्य व केंद्र सरकारकडून ’हर घर जल’चा नारा देत ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायमची संपविण्याचा दावा केला जात असला, तरी पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार आणि वाडा तालुक्यातील आदिवासी भागात वास्तव चित्र वेगळेच दिसत आहे. कोट्यवधी रुपयांच्या जलजीवन मिशन योजनेची कामे अपूर्ण, रखडलेली किंवा अकार्यक्षम ठरल्याने अनेक गावपाड्यांतील नागरिकांना आजही घोटभर पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. वाढत्या पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, विविध ठिकाणी आंदोलनांचा इशाराही देण्यात आला आहे.
            जव्हार तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायतीअंतर्गत नांदगाव, राजेवाडी, जांभूळवाडी, बंदराचीवाडीसह पाच गावपाड्यांमध्ये जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. राजेवाडी येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असला तरी इतर गावपाड्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. अनेक विहिरी कोरड्या पडल्या असून नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. जांभूळवाडी येथील जलजीवन मिशनअंतर्गत उभारण्यात येणारी पाण्याची टाकी अनेक महिन्यांपासून अपूर्ण 
अवस्थेत असल्याने योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळालेला नाही.
   युवा कार्यकर्ते वैभव गोंदके यांनी ग्रामसभेत पाणीप्रश्न उपस्थित करत प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याचा आरोप केला आहे. शासनाकडून कोट्यवधींचा खर्च होत असतानाही आदिवासींना मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत आहे.
             दरम्यान, मोखाडा तालुक्यातील वाघ्याचीवाडी परिसरातही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या विहिरींनी तळ गाठला असून काही विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे महिलांना डोक्यावर हंडे-कळशा घेऊन भर उन्हात मैलोन्मैल पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. घरगुती वापरासह जनावरांच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
 मोखाड्यातील दुर्गम वाड्या-वस्त्यांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत न् अप्पर वैतरणा धरणातून पाणी आणण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली. पाईपलाईन टाकण्याचे कामही करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्याने ग्रामस्थांचा भ्रमनिरास झाला आहे. आंदोलनानंतर प्रशासनाने काही दिवसांसाठी विहिरीत पाईप टाकून पाणीपुरवठा केला; मात्र तोही अल्पकाळ टिकला. त्यानंतर पुन्हा पुरवठा बंद झाल्याने परिस्थिती पूर्ववत झाली.
           धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. पाणी मिळत नसल्याने महिलांचा दिवसाचा मोठा वेळ पाणी शोधण्यात जात असून घरातील कामे आणि उपजीविकेवरही त्याचा परिणाम होत आहे. दोन दिवसांत पाणीपुरवठा नियमित न झाल्यास अधिकार्‍यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
            ’श्रमजीवी’ संघटनेचे मोखाडा तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन  
      पाणीप्रश्नासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत ’श्रमजीवी’ संघटनेने मोखाडा तहसील कार्यालयावर दिवसभर ठिय्या आंदोलन छेडले. जलजीवन मिशनची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी, रखडलेली विकासकामे पूर्ण करावीत, पीएम घरकुल योजनेचे थकित हप्ते द्यावेत, आधार-जॉबकार्ड संलग्नीकरणाची कामे उपलब्ध करून द्यावीत, तसेच विविध योजनांमध्ये अनियमितता करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.
           संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीत झालेल्या त्रुटींसाठी संबंधित शाखा अभियंता व उपअभियंत्यांवर कारवाईची मागणी केली. ठआदिवासी महिलेच्या डोक्यावरील हंडा अजूनही खाली उतरलेला नाही. दोषींवर कारवाई किंवा लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही,ठ अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
            पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आणि वाडा या तीन तालुक्यांतील सुमारे ८० गावपाड्यांमध्ये प्रशासनाने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला असला, तरी अनेक दुर्गम भागांपर्यंत तो नियमितपणे पोहोचत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी भागातील पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून, जलजीवन मिशनच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

Leave Your Comments