ग्रामपंचायतींना जलसंधारण व घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण; पालघर जिल्ह्यातील ३० गावांचा सहभाग

Date: 2026-03-13
news-banner
नवयुग पालघर विशेष :

**ग्रामपंचायतींना जलसंधारण व घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण; 
पालघर जिल्ह्यातील ३० गावांचा सहभाग**

पालघर, दि. ११ : ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची शाश्वतता वाढविणे आणि गावपातळीवरील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी ग्रामपंचायतींची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद पालघर, सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन (CWAS) – सीईपीटी युनिव्हर्सिटी आणि एचडीएफसी बँकेच्या ‘परिवर्तन’ CSR उपक्रमाच्या सहकार्याने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत देण्यात आली.

या कार्यशाळेत पालघर व डहाणू तालुक्यातील 
३० ग्रामपंचायतींचे सरपंच व प्रतिनिधी सहभागी झाले. गावपातळीवर जलसंधारण, पिण्याच्या पाण्याची शाश्वतता आणि घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन, अंमलबजावणी व दीर्घकालीन व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाचे लेखाधिकारी पांडुरंग कोरडे, CWAS–सीईपीटी युनिव्हर्सिटीचे ध्रुव भावसार, केंद्राचे प्रमुख असीम मन्सूरी, उपासना यादव तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

          स्थानिक लोकसहभागातून पाणी व कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबवता येऊ शकते.”असा विश्वास देत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी “गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्वच्छता सुविधांचे नियमित संचालन व देखभाल ग्रामपंचायतींनी जबाबदारीने करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यशाळेदरम्यान ग्रामीण भागातील घनकचरा व्यवस्थापन तसेच पावसाचे पाणी संकलन याबाबत तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

चौकट : ‘परिवर्तन’ उपक्रमांतर्गत ५० गावांमध्ये विकासकामे

जिल्हा परिषद पालघर आणि सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन (CWAS) यांच्या संयुक्त विद्यमाने एचडीएफसी बँकेच्या ‘परिवर्तन’ उपक्रमांतर्गत डहाणू, मोखाडा आणि पालघर तालुक्यातील ५० निवडक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची शाश्वतता व घनकचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

जलव्यवस्थापन क्षेत्रात आतापर्यंत महत्त्वपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. वैयक्तिक व समुदाय स्तरावर एकूण ६३ पावसाचे पाणी अडवा व जिरवा( ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’) प्रकल्प, तर संस्थात्मक स्तरावर १६ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. याशिवाय ४ ठिकाणी सौर ऊर्जेवर आधारित लघु नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आल्या असून ११ विहिरींचे पुनरुज्जीवन व दुरुस्ती करण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे पावसाच्या पाण्याची साठवण वाढून उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी करण्यास मदत होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतींना तांत्रिक सहाय्य देण्यात येत असून ‘माहिती, शिक्षण व संवाद’ (IEC) माध्यमातून लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला जात असून कचरा संकलनाचे नियोजन, बचत गटांचा सहभाग आणि डहाणू तालुक्यातील गंजाड येथे कार्यान्वित ‘मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी’ (MRF) यांसारख्या कमी खर्चिक सुविधांमुळे गावपातळीवर कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होत असल्याचे यावेळी सांगितले.

शासकीय योजनांच्या अभिसरणावर भर :
या कार्यशाळेत जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), प्रधानमंत्री आवास योजना, मनरेगा, माझी वसुंधरा अभियान, पेसा, प्रधानमंत्री जनमन योजना आदी विविध शासकीय योजनांच्या अभिसरणातून (Convergence) गावांचा शाश्वत विकास कसा साधता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत सहभागी सरपंच व ग्रामपंचायत प्रतिनिधींनीही आपल्या गावातील अनुभव मांडत पाणी व घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी सूचना मांडल्या.

सहभागी ग्रामपंचायती : 
या प्रशिक्षणात पालघर तालुक्यातील वसरोली-खरशेत, काटाळे,लोवरे,निहे, महागाव, खानीवडे
कोंढाण, अवढाणी,किराट मनोर शेलावली गोवाडे, नागझरी, मासवण, नेटाळी, नावझे, खानिवली आणि नंडोरे यासह डहाणू तालुक्यातील गंजाड, विवळवेढा, घोलवड, रानशेत, सारणी, निकवली, धाकटी डहाणू, चिंचणी, बोर्डी, आशागड, , कासा, आदी ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या प्रशिक्षणामुळे ग्रामपंचायतींमध्ये पाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत तांत्रिक क्षमता प गावपातळीवर स्थानिक स्वामित्वाची भावना बळकट होऊन शाश्वत विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave Your Comments