नवयुग पालघर विशेष :
**थकीत मजुरीसह विविध मागण्यांसाठी मस्ताननाका ते विक्रमगड तहसील कार्यालयावर २३ किमी पायी लॉंग मार्च**
विक्रमगड : पालघर जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेतील मजुरांची तब्बल ५२ कोटी ४५ लाख रुपयांची थकीत मजुरी तातडीने देण्यात यावी, तसेच आदिवासी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, या मागण्यांसाठी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष (लाल बावटा) यांच्या वतीने १० मार्च २०२६ रोजी ‘शिमगा मोर्चा’ काढण्यात आला. मस्ताननाका येथून सकाळी ११ वाजता या मोर्चाची सुरुवात झाली. कार्यकर्ते व नागरिकांनी मस्ताननाका ते विक्रमगड तहसीलदार कार्यालयापर्यंत सुमारे २३ किलोमीटर अंतर पायी चालत लॉंग मार्च करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
मोर्चा तहसीलदार कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. रोजगार हमी योजनेतील थकीत मजुरी, घरकुल लाभार्थ्यांचे थकीत हप्ते, वनहक्क दावे, आदिवासी पाड्यांवरील वीज जोडणी, तसेच विविध योजनांमधील भ्रष्टाचाराविरोधात कारवाई यांसारख्या मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.
मोर्चातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
*पालघर जिल्ह्यातील रोजगार हमी योजनेतील मजुरांची ५२ कोटी ४५ लाख रुपयांची थकीत मजुरी तातडीने अदा करावी.
*विश्वासू भावांच्या बहुउद्देशीय हॉलवर घरपट्टी आकारणी करावी.
*बोगस मस्टर तयार करून भ्रष्टाचार करणाऱ्या रोजगार सेवकांवर कारवाई करावी.
*घरकुल लाभार्थ्यांचे थकीत हप्ते तातडीने वितरित करावेत.
*प्रत्येक गरजू आदिवासी कुटुंबाला अंत्योदय योजनेनुसार ३५ किलो धान्य द्यावे.
*आपटी बुद्रुक-चिचघर जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा.
*प्रलंबित वनहक्क दावे तातडीने निकाली काढावेत.
*दुबार शेतीतील भाजीपाला पिकांना (गवार, चौळी, मिरची, भेंडी आदी) योग्य बाजारभाव मिळावा.
*विविध प्रकल्पांमुळे बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊनच कामे सुरू करावीत व दादागिरी थांबवावी.
*आदिवासी पाड्यांमध्ये त्वरित वीज जोडणी द्यावी.
या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.