**विरारमध्ये ‘कोकण विभागीय सरस महोत्सवा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद;
नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन**
ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहांनी तयार केलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थ, हस्तकला आणि विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कोकण विभागीय सरस महोत्सवा’चे उद्घाटन विरार येथे उत्साहात पार पडले. नागरिकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेट देऊन महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मान्यवरांनी यावेळी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा परिषद पालघर, वसई-विरार महानगरपालिका तसेच कोकण विभागीय आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्यास वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, कोकण भवनचे अप्पर आयुक्त माणिक दिवे तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते उपस्थित होते.
उद्घाटनानंतर मान्यवरांनी महोत्सवातील विविध खाद्यपदार्थ आणि उत्पादनांच्या स्टॉलना भेट देत महिला स्वयंसहायता समूहांच्या कार्याचे कौतुक केले. ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेले पारंपरिक पदार्थ, हस्तकला वस्तू आणि विविध उपयुक्त उत्पादनांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महापौर अजीव पाटील यांनी यावेळी बोलताना, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वयंसहायता समूहांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगून जिल्हा परिषद अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असल्यास, वसई-विरार महानगरपालिका नेहमीच सहकार्य करेल, असे स्पष्ट केले.
कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या महोत्सवातील विक्री एक कोटी रुपयांचा टप्पा गाठेल, असा विश्वास व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला मोठे बळ मिळत असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद पालघरच्या आरोग्य विभागामार्फत ‘अॅनिमिया मुक्त पालघर’ जनजागृती अभियान तसेच HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेचा आरंभ करण्यात आला.
या निमित्ताने महा आवास अभियान २०२४–२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत प्रथम क्रमांक पटकविलेल्या तलासरी तालुक्याचा व द्वितीय क्रमांक पटकविलेल्या जव्हार आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या वाडा तालुक्याचा तद्वत
राज्य पुरस्कृत आवास योजना अंतर्गत पालघर तालुक्याने प्रथम क्रमांक मिळविलेल्या पालघर तालुक्यासह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवकांचा गौरव करण्यात आला.
तसेच प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (PM-JANMAN) अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलासाठी ग्रामपंचायत टेंभी (ता. वसई) येथील लाभार्थी मनोज मधु सवरा यांना प्रतीकात्मक स्वरूपात घरकुलाच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या.
याशिवाय UNDP आणि उमेद यांच्या संयुक्त उपक्रमातून पालघर व डहाणू तालुक्यातील ११ महिला स्वयंसहायता समूहांना शोभिवंत मत्स्यपालन, खेकडा पालन, मासे प्रक्रिया आणि फिश व्हॅल्यू अॅडिशन यांसारख्या उपजीविका उपक्रमांसाठी ९० टक्के अनुदानावर निधी वितरित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी महिला स्वयंसहायता समूहांच्या परिश्रमांचे कौतुक करत महिलांनी उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साधावे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
महोत्सवात कोकणातील विविध जिल्ह्यांमधील महिला स्वयंसहायता समूहांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, हस्तकला आणि विविध उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असून नागरिकांनी कुटुंबासह भेट देऊन खरेदी करावी आणि ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावेळी जिल्हा परिषद व महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने महिला स्वयंसहायता समूहांच्या सदस्यांची उपस्थिती होती.