जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; मागील वर्षाच्या तुलनेत यंदा टँकरवरील अवलंबित्व वाढले

Date: 2026-05-16
news-banner
नवयुग पालघर : 

**जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; मागील वर्षाच्या तुलनेत यंदा टँकरवरील अवलंबित्व वाढले**

            जिल्ह्यात भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत असून ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. १० मे २०२६ पर्यंतच्या साप्ताहिक अहवालानुसार सध्या
 २४ गावे व ७९ पाड्यांना ३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या माध्यमातून ३६ हजार ३३७ नागरिक व १४ हजार ३७३ पशुधनाची तहान भागवली जात आहे. तुलनेत मागील वर्षी (जानेवारी ते जून २०२५) १५ गावे व ११८ पाड्यांसाठी ३६ टँकर कार्यरत होते आणि ४२ हजार २७२ नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत होता. यंदा गावांची संख्या कमी असली तरी प्रभावित लोकसंख्या आणि टँकर फेर्‍यांमध्ये वाढ झाल्याने संकट अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट होते.
             जव्हार तालुक्यात यंदा सर्वाधिक गंभीर परिस्थिती आहे. सध्या १६ गावे व २३ पाड्यांसाठी १७ टँकरद्वारे दरदिवशी ५३ फेर्‍या होत असून २१ हजार ३१५ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी जव्हारमध्ये ६ गावे व २९ पाड्यांसाठी १६ टँकर कार्यरत होते आणि दरदिवशी सुमारे ३८.४९ फेर्‍यांद्वारा पाणीपुरवठा केला जात होता. यंदा टँकरसंख्या वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
           वाडा तालुक्यात यंदा ६ गावे व ३५ पाड्यांसाठी ६ टँकरद्वारे दरदिवशी २० फेर्‍या होत असून ०७ हजार ६२७ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. मागील वर्षी येथे ५ गावे व ३९ पाड्यांसाठी ६ टँकर कार्यरत होते.म्हणजेच 
 गावपाड्यांची व्याप्ती आणि टँकरची गरज दोन्ही वाढल्या आहेत.

               मोखाडा तालुक्यात यंदा २ गावे व २१ पाड्यांसाठी १ टँकरद्वारे आठवड्याला १६१ फेर्‍या करून ९ हजार १६६ नागरिकांना पाणी दिले जात आहे. मागील वर्षी मोखाड्यात ४ गावे व ३३ पाड्यांसाठी १२ टँकर कार्यरत होते. यंदा टँकरसंख्या कमी असली तरी एका टँकरवर मोठा ताण पडत असल्याचे चित्र आहे.

                 विक्रमगड तालुक्यात मागील वर्षी २७ पाड्यांसाठी २ टँकर कार्यरत होते, मात्र यंदा या तालुक्यातील परिस्थितीत काहीशी सुधारणा झाल्याने टँकरची गरज भासलेली नाही.

            जिल्हाभरात सध्या दररोज सरासरी ९६.२२ फेर्‍या, तर आठवडाभरात ६७३ फेर्‍यांद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रशासनाने अतिरिक्त टँकर सज्ज ठेवले असले तरी भूगर्भजलाची घटती पातळी, अपुरे जलसंधारण आणि वाढते तापमान यामुळे दरवर्षी उद्‌भवणार्‍या या संकटावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज अधिक तीव्रतेने समोर आली आहे.

Leave Your Comments