**“सत्यमेव जयते फार्मर कप”च्या माध्यमातून जिल्ह्यात
गटशक्तीतून शाश्वत शेतीचा नवा संकल्प**
बदलत्या हवामानाचा वाढता प्रभाव, शेतीतील वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील अस्थिरता या आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी गटशक्तीच्या माध्यमातून एकत्र येत ज्ञानाधारित आणि शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारणे ही काळाची गरज आहे, असा स्पष्ट संदेश पाणी फाउंडेशनच्या “सत्यमेव जयते फार्मर कप” उपक्रमांतर्गत आयोजित मेंटॉर कार्यशाळेतून देण्यात आला. जिल्हा परिषद पालघर मार्फत पार पडलेल्या या कार्यशाळेत पालघर जिल्ह्यातील शेतकरी संघटन अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेत पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “सत्यमेव जयते फार्मर कप हा केवळ स्पर्धात्मक उपक्रम नसून ज्ञान, संघटन आणि गटशक्तीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करणारी व्यापक चळवळ आहे.” गावागावांत ज्ञानाची ओढ असलेले सक्षम शेतकरी गट निर्माण करणे आणि प्रशिक्षित मेंटॉर घडविणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही कार्यशाळा उमेद अभियान, कृषी विभाग, आत्मा अंतर्गत कार्यरत मेंटॉर तसेच विविध विभागांतील मार्गदर्शकांसाठी आयोजित करण्यात आली होती. उमेद अभियानाचे मेंटॉर, जिल्हास्तरीय अधिकारी, आत्मा विभागाचे प्रतिनिधी, गटविकास अधिकारी आणि कृषी अधिकारी यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. शेतकऱ्यांपर्यंत हा उपक्रम प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी सर्वांनी मार्गदर्शक म्हणून पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी डॉ. पोळ यांनी शेतकऱ्यांना परिपूर्ण ज्ञान देण्यासाठी सक्षम आणि प्रशिक्षित मेंटॉर आवश्यक असल्याचे सांगत “हातात हात घालून काम करूया आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी एकत्र येऊया,” असे आवाहन त्यांनी केले. बदलत्या काळात डिजिटल शेती शाळा गावागावांत पोहोचविणे आणि ज्ञान व्यवस्थापनाची सशक्त संस्कृती निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
फार्मर कप उपक्रमांतर्गत सामूहिक शेती, उत्पादन खर्चात बचत, आधुनिक व वैज्ञानिक शेतीचा प्रसार, महिलांचे सक्षमीकरण, हवामान बदलाशी जुळवून घेणारी शेती आणि बाजारपेठ उपलब्धता यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच पाणी नियोजन, मृदा आरोग्य, कीड नियंत्रण आणि पीक व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर शेतकऱ्यांना सखोल प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उमेद अभियानाच्या कार्याचे कौतुक करत गावागावातील सावकारी पद्धती कमी करण्यात बचत गटांनी बजावलेल्या भूमिकेचा पोळ यांनी विशेष उल्लेख केला. त्यामुळेच पाणी फाउंडेशन उमेद अभियानाला सलाम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी बदलत्या कृषी परिस्थितीत शेतकऱ्यांनी गटशक्तीच्या माध्यमातून एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शेतकरी गटांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार, उत्पादन खर्चात बचत आणि शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ मिळविणे शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागातील शेतकरी आत्मनिर्भर व्हावेत आणि युवकांनी शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमांतर्गत निवासी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जाणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या गटांना तालुका व राज्यस्तरावर पुरस्कार आणि बक्षिसे दिली जाणार आहेत. २०१६ पासून महाराष्ट्रातील ३५० हून अधिक तालुक्यांत हा उपक्रम राबविण्यात येत असून लाखो शेतकरी कुटुंबांना त्याचा लाभ झाला असल्याचा दावा यावेळी करण्यात आला व पालघर जिल्ह्यातही या उपक्रमामुळे शाश्वत आणि गटशक्तीवर आधारित शेतीला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यशाळेला आत्माचे प्रकल्प संचालक विनायक पवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी, उपविभागीय कृषी अधिकारी विश्वास बर्वे तसेच कृषी विभागाचे अधिकारी, मेंटॉर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.