**बोर्डीची प्रेरणादायी यशोगाथा : सौरऊर्जेवर आधारित फळ-भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट**
पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथील शेतकऱ्यांनी आणि महिला उद्योजिकांनी एकत्र येत ग्रामीण भागातील अन्नप्रक्रिया क्षेत्रात नवा इतिहास घडवला आहे. सौरऊर्जेचा वापर करून नैसर्गिक व पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या अभिनव तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट मानांकन मिळाले असून, यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. “रुवान फूडटेक - ऑरा ग्रीन” या स्टार्ट-अप संस्थेच्या माध्यमातून विकसित केलेली ही प्रणाली ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारी ठरत आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिला बचत गटांना अन्नप्रक्रिया उद्योगातील तांत्रिक अडचणी, महागडी यंत्रसामग्री, विजेची कमतरता आणि विपणनातील अडथळे यांचा सामना करावा लागत होता. या सर्व समस्यांवर मात करत विदुला पाटील, हिमाली वर्तक आणि प्रियांका राऊत यांनी सौरऊर्जेवर आधारित, विजेशिवाय चालणारी, सोपी आणि देखभाल खर्च नसलेली प्रक्रिया प्रणाली विकसित केली. या प्रणालीमुळे १००% नैसर्गिक, रसायनमुक्त आणि निर्यातीस योग्य उत्पादने तयार होऊ लागली आहेत.
या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे फळे, भाजीपाला, पालेभाज्या, औषधी वनस्पती तसेच मासे यांसारख्या विविध घटकांचे केवळ ३ ते १२ तासांत नैसर्गिक पद्धतीने निर्जलीकरण करता येते. या प्रक्रियेत पोषक घटक, रंग, चव आणि सुगंध पूर्णतः जतन होतात. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत ही पेटंटेड प्रक्रिया तब्बल तीनपट अधिक कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. आजपर्यंत ५० हून अधिक प्रकारच्या कृषी उत्पादनांवर यशस्वी प्रयोग करण्यात आले असून, प्रक्रिया केलेला माल बारा महिन्यांपर्यंत सुरक्षित साठवता येतो.
या प्रकल्पाचे संशोधक निनाद पाटील आणि निमिष राऊत यांनी विशेषतः चिकू फळ प्रक्रियेमध्ये मोठे यश मिळवले आहे. त्यांच्या पद्धतीने तयार केलेले चिकू चिप्स आणि पावडर यांना भारतीय बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण झाली आहे. आईस्क्रीम, कुल्फी, मिठाई आणि मिल्कशेक उद्योगांसाठी हे उत्पादन अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
या प्रणालीच्या पहिल्या लाभार्थी आणि ज्येष्ठ प्रक्रिया उद्योजिका लतिका पाटील यांनी सांगितले की, या पद्धतीमुळे तयार होणाऱ्या चिकू उत्पादनांची गुणवत्ता, रंग आणि चव उत्कृष्ट राहते. पोषक तत्त्वे आणि फायबर जतन होत असल्याने ग्राहकांना शुद्ध आणि दर्जेदार अन्न मिळते. पालघर जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पिकणारा आणि वाया जाणारा चिकू आता या प्रक्रियेमुळे उपयोगात येत असून, स्थानिक महिलांनी त्यातून आर्थिक प्रगती साधली आहे.
चिकूप्रमाणेच वसई परिसरातील प्रसिद्ध “सुकेळी” वर केलेले प्रयोगही यशस्वी ठरले आहेत. स्वच्छ आणि नियंत्रित पद्धतीने केवळ ३-४ दिवसांत सुकेळी तयार करण्यास यश आले आहे.
या प्रणालीद्वारे आंबा, फणस, कोकम, सुपारी, अननस, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, पपई, केळी, अंजीर, संत्री, मोसंबी, रानफळे, नारळ, अवाकाडो, सफरचंद यांसारखी फळे; तसेच टोमॅटो, कांदा, आले, लसूण, बीटरूट, कारले, भेंडी, वांगी, गाजर, मुळा, शेवग्याच्या शेंगा, गवार, दुधी, पालक, मेथी यांसारख्या भाज्या; तुळस, मोरिंगा, कडीपत्ता, पुदिना, चहापत्ती अशा औषधी वनस्पती; तसेच गुलाब, जासवंदी यांसारख्या फुलांच्या पाकळ्या आणि करंदी, सोडे, पापलेट, बांगडा यांसारखे मासे यांचेही प्रभावी मूल्यवर्धन शक्य झाले आहे.
या नाविन्यपूर्ण संशोधनाला प्रा. डॉ. दीप्ती दुर्गेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांनी या शोधामुळे भारतीय कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
बोर्डीच्या शेतकऱ्यांची ही यशोगाथा केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित न राहता, संपूर्ण देशातील ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी ठरत आहे. सौरऊर्जेचा प्रभावी वापर, नैसर्गिक प्रक्रिया आणि स्थानिक संसाधनांचा योग्य उपयोग यामुळे भारतातील शेतमाल प्रक्रियेला एक नवी दिशा मिळत आहे.