पावसाळ्यापूर्वी प्रशासनाला सज्जतेचे आदेश; दुर्गम भागात अन्नसाठा, आरोग्य केंद्रांत औषधसाठा अनिवार्य : पालकमंत्री गणेश नाईक

Date: 2026-05-18
news-banner
नवयुग पालघर ; 

**पावसाळ्यापूर्वी प्रशासनाला सज्जतेचे आदेश; दुर्गम भागात अन्नसाठा, आरोग्य केंद्रांत औषधसाठा अनिवार्य : पालकमंत्री गणेश नाईक**

            संभाव्य अतिवृष्टी, पूरस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवत दुर्गम भागात अन्नधान्याचा पुरेसा साठा आणि आरोग्य केंद्रांमध्ये अत्यावश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करावी, असे स्पष्ट निर्देश वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले. पूरस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

           जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक तसेच खरीप नियोजन बैठक पार पडली. यावेळी खासदार 
डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी 
डॉ. इंदु राणी जाखड, वसई-विरार महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., डहाणू प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, पालकमंत्र्यांचे खाजगी सचिव भावनजी आगे पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

             बैठकीत पालकमंत्री नाईक यांनी दुर्गम वाड्या-वस्त्यांमध्ये मुसळधार पावसामुळे संपर्क तुटण्याची शक्यता लक्षात घेऊन तेथे आधीच अन्नधान्य, चहा, साखर, बिस्किटे आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले. नागरिक सात-आठ दिवस गावाबाहेर पडू शकले नाहीत, तरी स्थानिक स्तरावरून त्यांना आवश्यक पुरवठा मिळाला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. यासाठी नवी मुंबई महापालिकेतील यशस्वी आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचा दाखलाही त्यांनी दिला.

               पूरग्रस्त भागात मदत पोहोचवण्यासाठी उंचावरील विशेष वाहनांची व्यवस्था करण्यासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंशावरील औषधांसह अत्यावश्यक औषधसाठा मुबलक प्रमाणात ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही औषधांची गुणवत्ता अबाधित राहील, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

             शहरी भागातील उघड्या विद्युत वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर आणि पाणी साचणाऱ्या ‘हॉटस्पॉट’ परिसरांची आगाऊ ओळख करून दुर्घटना टाळण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी दिले. नवी मुंबईतील ‘होल्डिंग पाँड’ संकल्पनेमुळे पूरस्थिती नियंत्रणात राहिल्याचे नमूद करत पालघर जिल्ह्यातही अशा प्रकल्पांना गती देण्याचे संकेत त्यांनी दिले.

                  आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील माहिती सोशल मीडिया, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देत, जनजागृती मोहिमेला अधिक गती देण्याच्या सूचनाही पालकमंत्री नाईक यांनी दिल्या.

Leave Your Comments