सातपाटीत ३५० कोटीचा मत्स्यबंदर प्रकल्प

Date: 2026-05-18
news-banner
,नवयुग पालघर : 

**सातपाटीत ३५० कोटीचा मत्स्यबंदर प्रकल्प**

            पालघर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण मासेमारी केंद्र असलेल्या सातपाटी येथे सुमारे ३५० कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक मत्स्यबंदर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या या बंदरांतर्गत पारंपरिक मच्छीमारांना आधुनिक सुविधा, सुरक्षित नौकावाहतूक, मासळी प्रक्रिया सुविधा उपलब्ध होणार आहेत.

             या कार्यक्रमाला राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, सातपाटीच्या सरपंच सीमा भोईर, मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, मनिषा चौधरी, विलास तरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, यांच्यासह विविध मान्यवर, आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             या प्रकल्पाअंतर्गत बंदराचे खोलीकरण, अत्याधुनिक जेट्टी, सुरक्षित नौकानयन सुविधा, मासळी प्रक्रिया केंद्र आणि पर्यटनविकासाला चालना देणारी विविध कामे करण्यात येणार आहेत. सातपाटी खाडीत साचलेल्या गाळामुळे नौकावाहतूक आणि मासेमारीत निर्माण होणार्‍या अडचणी या बंदरामुळे दूर होतील असे यावेळी सांगण्यात आले.

            “सातपाटी बंदराचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रकल्प नसून पालघर जिल्ह्याच्या आर्थिक परिवर्तनाचा पाया आहे. या प्रकल्पामुळे सातपाटीचा चेहरामोहरा बदलेल आणि भविष्यात हे गाव नगरपालिका होण्याइतपत विकसित होईल असे स्वप्न उभे करत, पारंपरिक मच्छीमारांच्या हिताला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले.
           तर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सातपाटी बंदर प्रकल्प हा पारंपरिक मच्छीमारांच्या आर्थिक समृद्धीचा महामार्ग ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करत, ठेकेदाराला २४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण झालेच पाहिजे असे बजावले.

Leave Your Comments