महिलांच्या कर्तृत्वा,ची ‘सरस’ झेप; ५ दिवसांत १.१० कोटींची विक्री, महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श

Date: 2026-03-19
news-banner
**महिलांच्या कर्तृत्वा,ची ‘सरस’ झेप; ५ दिवसांत १.१० कोटींची विक्री, महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श**

           विरार येथे आयोजित ‘कोकण विभागीय सरस महोत्सव २०२६’ने अवघ्या पाच दिवसांत तब्बल १ कोटी १० लाख ६४० रुपयांची उलाढाल नोंदवत ग्रामीण व शहरी महिला स्वयंसहायता बचत गटांच्या कर्तृत्वाला भक्कम व्यासपीठ मिळवून देत विक्रीचे नवे विक्रम प्रस्थापित केले. या महोत्सवाने महिला सक्षमीकरणाला नवी दिशा दिली असून, हा उपक्रम यशस्वीतेचा नवा मापदंड ठरला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी म्हटले आहे.

          १२ ते १६ मार्च दरम्यान पार पडलेल्या या महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद पालघर आणि वसई-विरार महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत ८९ लाख १२ हजार २० रुपये, तर महानगरपालिकेच्या (NULM) माध्यमातून २० लाख ८८ हजार ६२० रुपये इतकी विक्री झाली. एकत्रितपणे कोटींचा टप्पा पार करत महिलांनी आपल्या कष्टाचे चीज करून दाखवले.

             महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केलेला ‘महिला बचत गट कोटीचा टप्पा पार करतील’ हा विश्वास महिलांनी प्रत्यक्षात उतरवत उल्लेखनीय कामगिरी केली.

            समारोप सोहळा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अप्पर आयुक्त (विकास) डॉ. माणिक दिवे तसेच प्रकल्प संचालिका (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) डॉ. रूपाली सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

               महोत्सवातील विविध स्टॉल्समध्ये ग्रामीण महिलांनी सादर केलेल्या मसाले, पापड, लोणची, मिठाई, दुग्धजन्य पदार्थ, चॉकलेट, आर्टिफिशियल ज्वेलरी, बांबू व लाकडी वस्तू, फुले-तोराण आणि गृहउपयोगी उत्पादनांना ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही बचत गटांनी उत्कृष्ट मांडणी आणि विक्रीत आघाडी घेत विशेष ठसा उमटवला.

           या महोत्सवातून महिलांना केवळ विक्रीच नव्हे तर नव्या व्यावसायिक संधीही प्राप्त झाल्या. वाडा कोलम तांदूळ, बेसन, शेवया आणि मोरिंगा पावडर यांसारख्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर मागणी मिळाली. त्यामुळे ग्रामीण उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरला. तसेच डिमार्ट चे व्यवस्थापक नायडू यांनीही भेट देत उत्पादनांची पाहणी केली.

       विक्रीत शहरी गटांमध्ये पांचाळ, तुळजाई आणि रुचिरा बचत गटांनी आघाडी घेतली, तर ग्रामीण गटांमध्ये श्री स्मरण (पालघर), माऊली (विक्रमगड) आणि साईकृपा (वाडा) स्वयंसहाय्यक समूहांनी उत्कृष्ट कामगिरी केली. उत्कृष्ट मांडणीसाठी आई वैष्णवी, ॲक्टिव्ह स्वयंम आणि श्री समर्थ महिला बचत गट विशेष ठरले. समारोपावेळी सर्व विजेत्या गटांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

           महोत्सवाला आमदार स्नेहा दुबे व आमदार राजन नाईक यांनी भेट देत महिलांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, महापालिका आयुक्त डॉ. मनोज कुमार सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांच्या नियोजनातून हा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनीही भेट देऊन महिलांना प्रोत्साहन दिले.

             “सरस महोत्सव हा ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणारा आणि त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा प्रभावी उपक्रम आहे. शहरी व ग्रामीण बचत गटांच्या संयुक्त सहभागातून असा महोत्सव आयोजित करण्याचा हा राज्यातील पहिलाच यशस्वी प्रयत्न ठरला असल्याचे मनोज रानडे यांनी म्हटले आहे.”
            तर डॉ. माणिक दिवे यांनी, “अशा व्यासपीठांमुळे ग्रामीण महिलांमधील उद्योजकतेला चालना मिळते आणि स्थानिक अर्थव्यवस्था बळकट होते,” असे मत व्यक्त केले.

           महोत्सवाला प्रसिद्धी देणाऱ्या योगिता नाईक, प्रतीक्षा डांगे व इशिका नवीन पाटील या यूट्यूबर्स व इन्फ्लुएन्सर्सनाही अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व पत्रकारांचाही गौरव करण्यात आला.

                 या महोत्सवाच्या माध्यमातून महिलांना थेट ग्राहकांशी संवाद साधण्याची, आपली उत्पादने प्रभावीपणे सादर करण्याची आणि मोठ्या प्रमाणावर विक्री करण्याची संधी मिळाली. विक्रीचा कोटीचा टप्पा पार करत महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आत्मविश्वास झळकत असल्याचे चित्र पाहायला मिळाल्याचे सांगून प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते यांनी आभार प्रदर्शन करत सर्व सहभागी व सहकाऱ्यांचे आभार मानले.

Leave Your Comments