जिल्ह्यातील मतदार संलग्निकरण प्रक्रियेदरम्यान न आढळलेले व त्रुटी आढळलेल्या मतदारांची संख्या चिंताजनक

Date: 2026-07-02
news-banner
नवयुग पालघर 

***जिल्ह्यातील मतदार संलग्निकरण प्रक्रियेदरम्यान न आढळलेले व त्रुटी आढळलेल्या मतदारांची संख्या चिंताजनक***

         पालघर जिल्ह्यातील मतदार संलग्निकरण (Mapping ) प्रक्रियेनंतर यामधील तफावत पुढे आली असून, एकूण २३ लाख ७६ हजार ५३ मतदारांपैकी १५ लाख ७८ हजार ५५० मतदारांचे संलग्निकरण पूर्ण झाले आहे, तर ७ लाख ९७ हजार ५०३ मतदार अद्याप असंलग्न (Unmapped ) अवस्थेत आहेत. जिल्ह्याची एकूण प्रगती ६६.४४ टक्के इतकी नोंदली गेली आहे.यात न आढळून आलेल्या मतदारांबरोबरीने नाव, वय आदी त्रुटी आढळलेल्या मतदारांची संख्या लक्षणीय म्हणूनच चिंताजनक परिणामी निवडणूक यंत्रणा तसेच राजकीय पक्ष व सामान्य मतदारांसाठी एकप्रकारे आव्हान आहे .
           मतदार संघनिहाय पाहता डहाणू हा मतदारसंघ आघाडीवर असून, ३ लाख ६ हजार ६३९ मतदारांपैकी
 २ लाख ७५ हजार ४९ मतदारांचे संलग्निकरण (८९.७%) पूर्ण झाले आहे. येथे फक्त ३१ हजार ५९० मतदार आढळून आलेले नाहीत. त्यानंतर विक्रमगड मतदारसंघात ३ लाख १५ हजार ७२९ पैकी २ लाख ७६ हजार ८९५ (८७.७%) मतदार संलग्निकरण झाले असून ३८ हजार ८३४ मतदार आढळलेले नाहीत. पालघर मतदारसंघात २ लाख ९८ हजार ४३३ पैकी २ लाख ५१ हजार ४४४ (८४.२५%) मतदारांचे संलग्निकरण झाले असून ४६ हजार ९८९ मतदारांशी संपर्क होऊ शकला नाही. 
         दुसरीकडे शहरी पट्‌ट्यातील चित्र चिंताजनक आहे. बोईसर मतदारसंघात ४ लाख ३८ हजार २८७ पैकी फक्त २ लाख ३६ हजार १२४ (५३.८७%) मतदारांचे संलग्निकरण झाले असून २ लाख २ हजार १६३ मतदार आढळून आले नाहीत . नालासोपारा मतदारसंघात सर्वाधिक ६ लाख ६२ हजार ५७ मतदारांपैकी केवळ ३ लाख ३९ हजार १२३ (५१.२२%) मतदार संलग्निकरण झाले असून तब्बल ३ लाख २२ हजार ९३४ मतदार अद्याप असंलग्न आहेत म्हणजे या मतदारांशी संपर्क होऊ शकला नाही . तर वसईमध्ये ३ लाख ५४ हजार ९०८ पैकी १ लाख ९९ हजार ९१५ (५६.३३%) मतदारांचे संलग्निकरण पूर्ण झाले असून १ लाख ५४ हजार ९९३ मतदारांशी संपर्क झाला नाही.
           विशेष म्हणजे, जिल्ह्यातील एकूण ७ लाख ९७ हजार ५०३ असंलग्न (Unmapped) मतदारांपैकी तब्बल ६ लाख ८० हजारांहून अधिक मतदार केवळ नालासोपारा, बोईसर आणि वसई या तीन मतदारसंघांत आहेत. म्हणजेच जिल्ह्यातील एकूण असंलग्न( Unmapping) पैकी सुमारे ८५ टक्के भार या तीनच मतदारसंघांवर आहे.
           यावरून ग्रामीण व आदिवासीबहुल भागात मतदार संलग्निकरण (mapping) वेगाने होत असताना, शहरी व दाट लोकवस्तीच्या भागात प्रक्रिया संथ असल्याचे स्पष्ट होत आहे. आगामी काळात जिल्ह्याची सरासरी वाढवण्यासाठी प्रशासनाला विशेषत: नालासोपारा, बोईसर आणि वसई या भागांवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार हे स्पष्ट आहे.

Leave Your Comments