जिल्ह्यात मतदार यादींचे विशेष सखोल पुनरीक्षण; ३० जूनपासून घराघरात मतदान केंद्र स्तरीय अधिकार्‍याची भेट

Date: 2026-07-02
news-banner
नवयुग पालघर 

****जिल्ह्यात मतदार यादींचे विशेष सखोल पुनरीक्षण; ३० जूनपासून घराघरात मतदान केंद्र स्तरीय अधिकार्‍याची भेट****


          आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा व पालघर या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण ( Special Intensive Revision ) व्यापक स्तरावर राबविण्यास सुरुवात झाली आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील एकूण २३ लाख ७६ हजार ५३ मतदारांच्या नोंदींची पडताळणी केली जाणार असून, त्यासाठी २,२७४ मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (ँथ्ध्े) नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि अचूक बनविण्यासाठी राजकीय पक्षांकडून नियुक्त मतदान केंद्र प्रतिनिधी (बूथ लेव्हल एजंट) यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी इंदू राणी जाखड आणि उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी जी. जे. गोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
              निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी या मोहिमेचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले असून, ही प्रक्रिया जूनपासून सुरू होऊन ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानुसार पालघर जिल्ह्यातही कामाला सुरुवात झाली आहे.
               या पुनरीक्षणासाठीचे वेळापत्रक
 २० ते २९ जून २०२६ या कालावधीत गणना फॉर्मची छपाई आणि बीएलओंचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येत आहे. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्र स्तरीय अधिकारी घराघरात जाऊन मतदारांना त्यांचे नाव व मतदार यादीतील तपशील अशी नोंद असलेले (प्री-फिल्ड गणना) फॉर्म देणार असून,त्यात पुढे आवश्यक माहिती, जसे २००२ च्या मतदार यादीत रक्ताच्या नात्यातील असलेले नाव(उदा. आई-वडील-आजी-आजोबा इ.) भरलेले फॉर्म गोळा करणार आहेत.
 ज्यांची नावे २००२ च्या मतदार यादीत नसतील त्यांनाही फॉर्म दिले जातील. मात्र अशा मतदारांनी आयोगाने सुचविलेल्या १३ पुराव्यांपैकी किमान एक तरी पुरावा यासोबत देणे बंधनकारक राहील.
 ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ५ ऑगस्ट २०२६ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत त्यावर सुनावणी होऊन, त्यावर निकाल होऊन १७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे.
              मतदान केंद्र स्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी येताना जे गणना फॉर्म देतील, त्यामध्ये सध्याच्या मतदार यादीतील उपलब्ध माहिती आधीच भरलेली असेल. तसेच २००२ ते २००४ दरम्यान झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातील नोंदी किंवा मतदारांच्या आई-वडील, आजी-आजोबांशी संबंधित काही जुनी माहितीही त्यात असू शकते. मतदारांना आवश्यक असल्यास ही माहिती स्वत:ही भरता येणार आहे. तसेच नवीन छायाचित्र देण्याची सुविधाही उपलब्ध असेल.
             सध्या जिल्ह्यात मतदान केंद्र स्तरीय अधिकार्‍या मार्फत विद्यमान मतदारांच्या नोंदींचे जुन्या यादीशी संलग्निकरण अर्थात मॅपिंग सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६६.४२ टक्के संलग्निकरण पूर्ण झाले असून, त्यापैकी २१.४० टक्के नोंदींमध्ये त्रुटी किंवा विसंगती आढळून आल्या आहेत. त्यामुळे ही पडताळणी प्रक्रिया अधिक महत्त्‌वाची ठरत आहे.
             मतदारांना २००२-०४ मधील जुनी माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून मिळवता येणार आहे. यासाठी त्या वेळचे राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि पूर्ण नाव ही माहिती भरावी लागेल. ही माहिती जतन करून आपल्या घरी येणार्‍या अधिकार्‍या कडे देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
           जिल्ह्याचा सध्याचा भाग तत्कालीन ठाणे जिल्ह्यात समाविष्ट होता.२००२ मध्ये ५९ वाडा,६१ वसई, ६२ पालघर,६३ डहाणू, ६४ जव्हार हे विधानसभा मतदारसंघ होते. 
         मतदान केंद्र स्तरीय अधिकार्‍यांना भेट देताना एखादे घर बंद आढळले, तर त्या घराला हा अधिकारी किमान तीन वेळा भेट देईल आणि त्याची अधिकृत नोंद ठेवली जाईल. मतदारांना भरलेले फॉर्म ऑनलाइन सादर करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे.
          मतदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार मसुदा यादी प्रसिद्ध केल्यानंतर, ज्यांच्या नोंदी जुन्या यादीशी जुळणार नाहीत किंवा त्यात विसंगती आढळेल, अशा मतदारांना निवडणूक नोंदणी अधिकार्‍यांकडून नोटीस दिली जाईल व त्यानुसार सुनावणी होऊन सदर मतदाराला आपण पात्र मतदार असल्याचे पुराव्यानिशी पटवून देण्याची संधी दिली जाईल. अशा मतदारांची यादी आणि नावे वगळण्याची कारणे स्थानिक स्वराज्य संस्था, तहसील कार्यालये तसेच निश्चित ठिकाणी प्रदर्शित केली जाणार आहेत.
           या प्रक्रियेत आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून करता येणार असला, तरी आधार कार्ड नागरिकत्वाचा पुरावा मानला जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
            प्रत्येक मतदारपर्यंत या मोहिमेची माहिती पोचावी यासाठी, या मोहिमेत गाव तसेच पाडा व शहरी भागात प्रत्येक प्रभाग, पाडा पातळीवरील सर्वसंबंधीत शासकीय कर्मचार्‍यांना व गृहनिर्माण सहकारी संस्थाना सहभागी करून घेतले जाणार आहे. या संपूर्ण मोहिमेत राजकीय पक्षांचाही सहभाग महत्त्‌वाचा मानला जात आहे. ८ प्रमुख राजकीय पक्षांनी ४,२२१ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी( बौएलओ) नियुक्त केले आहेत. प्रशासनाने सर्व पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकाधिक प्रतिनिधी नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे.
              मतदार यादी अचूक, त्रुटीरहित आणि सर्व पात्र नागरिकांचा समावेश असलेली राहावी, यासाठी प्रत्येक मतदाराने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन घरी भेट देणार्‍या अधिकार्‍याला आवश्यक माहिती आणि कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Leave Your Comments