**डहाणू फेस्टिव्हल २०२६ च्या माध्यमातून डहाणूच्या पर्यटन विकासाला चालना मिळून या निसर्गरम्य किनारपट्टीला पर्यटन नकाशावर विशेष स्थान मिळेल --परिवहन मंत्री प्रताप सरनाईक **
डहाणू फेस्टिव्हल २०२६ च्या माध्यमातून डहाणूच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार असून या निसर्गरम्य किनारपट्टीला राज्याच्या पर्यटन नकाशावर विशेष स्थान मिळेल, असा विश्वास राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. सी-व्ह्यू पार्क, डहाणू बीच येथे आयोजित या भव्य महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी, आमदार विनोद निकोले, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, माजी आमदार व संपर्क प्रमुख रविंद्र फाटक, पालघर नगराध्यक्ष उत्तम घरत, माजी आमदार सर्वश्री सुनिल भुसारा, अमित घोडा, श्रीनिवास वनगा, मनीषा निमकर,आनंदभाई ठाकूर, राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या वैदेही वाढाण, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा डहाणू प्रकल्प अधिकारी विशाल खत्री, मुख्याधिकारी अक्षय गुडदे, निलेश सांबरे,शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगराध्यक्ष राजेंद्र माच्छी यांच्या पुढाकारातून, विविध संस्था व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवाचे कौतुक करत मंत्री सरनाईक यांनी डहाणूसाठी प्रस्तावित १० बसेसऐवजी २५ बसेस देण्याची घोषणा केली. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळणार असून प्रवाशांना अधिक सोयी उपलब्ध होणार आहेत. तसेच ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या बस सेवेचे लवकरच अनावरण होणार असून पुढील सहा महिन्यांत ३,००० बसेस राज्याच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यातील काही बसेस डहाणूसाठी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पर्यटन विकासाच्या दृष्टीने सुमारे चार कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगत, लवकरच पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. डहाणू समुद्रकिनाऱ्यावर आयोजित या महोत्सवाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
२०, २१ आणि २२ मार्च या कालावधीत सुरू असलेल्या या महोत्सवात डहाणूच्या खाद्यसंस्कृती, पारंपरिक कला, हस्तकला आणि विविध कलाकृती स्टॉल्सच्या माध्यमातून जनतेसमोर सादर करण्यात आल्या आहेत. ‘डहाणू कट्टा’च्या माध्यमातून दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम रंगत असून समुद्रकिनारी पॅराग्लायडिंग तसेच कोस्टगार्डच्या विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भव्य उद्घाटन मिरवणूक, ढोल पथक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण झाले. दुसऱ्या दिवशी मॅरेथॉन, फिटनेस उपक्रम, ‘गाथा महाराष्ट्राची’ कार्यक्रम आणि बॉलीवूड नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. तर तिसऱ्या दिवशी ‘सुगम पहाट’, निसर्ग उपक्रम, बॉडी बिल्डिंग स्पर्धा, डीजे हाय एनर्जी क्लोजिंग नाईट आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह महोत्सवाची सांगता होणार आहे.
“उत्सव परंपरेचा, उत्सव आपल्या मातीचा” या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव डहाणूच्या सांस्कृतिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना देणारा ठरत असून भविष्यात अशा उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.