धानीवरी घटना : मृतांच्या कुटुंबांचे शासन पालकत्व घेणार; प्रत्येकी ५ लाख मदत, जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च शासन उचलणार

Date: 2026-05-21
news-banner
नवयुग पालघर 

**धानीवरी घटना : मृतांच्या कुटुंबांचे शासन पालकत्व घेणार; प्रत्येकी ५ लाख मदत, जखमींच्या उपचारांचा संपूर्ण खर्च शासन उचलणार**
            पालघर जिल्ह्यातील धानीवरी परिसरात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबांचे आदिवासी विकास विभाग पालकत्व स्वीकारणार असून जखमींवरील उपचारांचा शंभर टक्के खर्च शासन उचलणार असल्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

            धानीवरी गावाच्या हद्दीतील गेटीपाडा येथे झालेल्या या भीषण अपघातात बापूगाव व लाखातपाडा येथील आदिवासी बांधव साक्षगंध (साखरपुडा) कार्यक्रमासाठी आयशर टेम्पोमधून प्रवास करत असताना भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत एकूण १३ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी १२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतांमध्ये बापूगाव व लाखातपाडा येथील १२ तर वांगर्जे येथील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती डॉ. अशोक वुईके यांनी दिली.

          या दुर्घटनेत जखमी झालेल्या १७ जणांवर धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात उपचार सुरू असून औषधे, शस्त्रक्रिया तसेच इतर सर्व वैद्यकीय खर्च शासनाकडून केला जाणार आहे. जखमी पूर्णपणे बरे होईपर्यंत उपचारांची संपूर्ण जबाबदारी शासन घेईल, असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.

            अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य युद्धपातळीवर राबविले. प्रशासनाच्या तत्परतेमुळे जखमींना तातडीने उपचार उपलब्ध झाले.
पालकमंत्री गणेश नाईक यांनी खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्यासमवेत धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामदास मराड तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रुग्णांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून सविस्तर माहिती घेत त्यांनी सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी दुर्घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कासा ग्रामीण रुग्णालयालाही भेट देऊन वैद्यकीय सुविधा आणि उपचार व्यवस्थेची माहिती घेतली.

            अंत्यसंस्कारावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्यासमवेत खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, विनोद निकोले, हरिश्चंद्र भोये, विलास तरे, जिल्हाधिकारी मनोज रानडे, जिल्हा पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         “कोणत्याही कुटुंबाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. आदिवासी विकास विभाग या सर्व कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. प्रत्येक बाधित कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांच्या गरजा आणि समस्या दूर करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करेल,” असा विश्वास डॉ. अशोक वुईके यांनी व्यक्त केला.
 जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत बाधित कुटुंबांच्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

“ही घटना अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. हा आघात विसरणे शक्य नाही; मात्र या संकटाचा सामना करण्याची शक्ती सर्वांना लाभो,” अशा शब्दांत डॉ. अशोक वुईके यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.

Leave Your Comments