पालघर जिल्ह्याला राज्यात द्वितीय क्रमांकाचा मान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला

Date: 2026-05-21
news-banner
नवयुग पालघर

**पालघर जिल्ह्याला राज्यात द्वितीय क्रमांकाचा मान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला**

            प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल पालघर जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी स्वीकारला. ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना हक्काचे पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही राज्यस्तरीय दखल मानली जात आहे.

           “महाआवास अभियान २०२३-२४” अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पालघर जिल्ह्याने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या अंमलबजावणीत वेळेत उद्दिष्टपूर्ती, लाभार्थी केंद्रित नियोजन, प्रभावी प्रशासकीय समन्वय आणि योजनांच्या काटेकोर अंमलबजावणीच्या जोरावर राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला.

          या पुरस्कार वितरण सोहळ्यास केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, ग्रामविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

             पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागातील घरकुल योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने सातत्यपूर्ण पाठपुरावा करत लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. बांधकाम प्रक्रियेला गती देण्यासाठी वेळोवेळी आढावा बैठका, तांत्रिक मार्गदर्शन आणि निधी वितरणाची कार्यक्षम अंमलबजावणी करण्यात आली. पंचायत समित्या, ग्रामपंचायती आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या समन्वयातून लाभार्थ्यांना वेळेत घरकुल पूर्ण करण्यासाठी प्रभावी सहकार्य देण्यात आले.

           या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पंचायत समित्या, ग्रामपंचायती, अधिकारी-कर्मचारी तसेच लाभार्थ्यांचे अभिनंदन केले. पालघर जिल्ह्याने ग्रामीण विकासाच्या दिशेने केलेली ही उल्लेखनीय कामगिरी इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी असून, भविष्यातही ग्रामीण विकासाच्या विविध योजनांमध्ये जिल्हा अशीच उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave Your Comments