यशाचे क्षितिज आणि उद्याची झेप!

Date: 2026-05-21
news-banner
दहावी नंतर पुढे काय? नेमक्या कोणत्या शाखेमध्ये आपल्या मुलाने प्रवेश घ्यावा? आपल्या मुलाने कोणत्या क्षेत्रात करिअर करावे? तो यशस्वीपणे करिअर कशामध्ये करु शकेल? त्याला ती विशिष्ट शाखा झेपेल की नाही? पुढे त्यामध्ये त्याला निश्चित भवितव्य आहे की नाही? असे अनेक प्रश्न पालकांना सतावत असतात. या पार्श्वभूमीवर दरवर्षीनुसार मुख्याध्यापक, 
डॅरल थॉमस डिमेलो यांचे
हे अतिथी संपादकीय...

**यशाचे क्षितिज आणि उद्याची झेप!**

         मार्च २०२६ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (शालांत) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या पालघर जिल्ह्याने या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून राज्याच्या शैक्षणिक नकाशावर आपली मोहोर उमटवली आहे. ’नवयुग पालघर’ परिवारातर्फे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणार्‍या पालकांचे आणि त्यांना ज्ञानदान करणार्‍या शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन!

            पालघर हा भौगोलिकदृष्ट्‌या अत्यंत वैविध्यपूर्ण जिल्हा आहे. एका बाजूला वसई-विरारसारखा शहरी भाग आणि दुसर्‍या बाजूला जव्हार, मोखाडा, डहाणू, वाडा यांसारखा आदिवासी आणि ग्रामीण पट्टा! यंदाच्या निकालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्‌य म्हणजे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले घवघवीत यश.”अपुर्‍या सोयी-सुविधा असतानाही आश्रमशाळा आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदाही निकालाच्या टक्केवारीत मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. ही आपल्या जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.”केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर कृतीयुक्त शिक्षणावर भर दिल्यामुळे यंदाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत एक वेगळीच चमक दिसून येत आहे. 

         दहावीचा टप्पा पार करणे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा ’टर्निंग पॉईंट’ मानला जातो. मात्र, इथेच प्रवास थांबत नाही, तर खर्‍या अर्थाने करिअरच्या नव्या वाटा इथूनच सुरू होतात. विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणाची दिशा ठरवताना खालील बाबींचा आवर्जून विचार करावा:” पारंपरिक शाखा (कला, वाणिज्य, विज्ञान): गुणांच्या शर्यतीत न धावता, आपली आवड आणि कल ओळखून शाखा निवडा. विज्ञान शाखेतून वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीकडेच जावे असा कोणताही नियम नाही. वाणिज्य क्षेत्रात बँकिंग, सीए, फायनान्स तर कला शाखेत स्पर्धा परीक्षा, पत्रकारिता, डिझायनिंग तसेच मानसशास्र असे अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. 

         कौशल्य विकास आणि तंत्रशिक्षण (पदवी व डिप्लोमा): आपला जिल्हा औद्योगिकदृष्ट्‌या विकसित होत आहे. तारापूर (बोईसर), वाडा येथील एमआयडीसीमध्ये कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी असते. त्यामुळे दहावीनंतर आयटीआय किंवा पॉलिटेक्निक करून लवकरात लवकर रोजगाराच्या संधी मिळवणे हा एक अत्यंत हुशारीचा आणि व्यावहारिक निर्णय ठरू शकतो.

             व्यावसायिक अभ्यासक्रम: ट्रॅव्हल अँड टुरिझम, हॉटेल मॅनेजमेंट, अॅनिमेशन अशा नवनवीन क्षेत्रांमध्येही आज करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत.”ज्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी लक्षात घ्यावे की,”दहावीचा निकाल म्हणजे आयुष्याचा अंतिम निकाल नाही. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत किंवा जे काही विषयांत अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी अजिबात निराश होऊ नये. ’अपयश ही यशाची पहिली पायरी आहे’ हे लक्षात ठेवून जुलै महिन्यात होणार्‍या पुरवणी परीक्षेची जिद्दीने तयारी करावी. एका परीक्षेत कमी गुण मिळाले, म्हणून तुमची बुद्धिमत्ता किंवा कौशल्य कमी होत नाही.
 पालकांना आवाहन आहे की, ”आपल्या पाल्याची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाची क्षमता आणि कौशल्ये वेगळी असतात. पाल्यावर स्वत:च्या अपेक्षांचे ओझे न लादता, त्याच्या आवडीच्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी त्याला बळ द्या.”पालघर जिल्ह्याचे हे विद्यार्थी उद्याचे ’नवयुग’ घडवणार आहेत. या तरुण पिढीच्या पंखांमध्ये बळ देण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे. या सर्व विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचाल सुखकर, यशस्वी आणि ध्येयपूर्तीकडे नेणारी ठरो, याच ’नवयुग पालघर’तर्फे सदिच्छा!  

            -डॅरल थॉमस डिमेलो, मुख्याध्यापक, डॉ. स. दा. वर्तक विद्यालय, बोईसर तथा अध्यक्ष, पालघर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ .

Leave Your Comments