नवयुग पालघर :
**उद्धव ठाकरे शिवसैनिक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर **
पालघरमधील आदिवासींच्या प्रश्नांकडे सरकारने वेळीच लक्ष द्यावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना नेत्यांनी आज पालघर येथे काढलेल्या भव्य धडक मोर्चातून दिला. कुपोषण, पाणीटंचाई, बेरोजगारी, वनहक्क, आरोग्य व शिक्षण अशा मूलभूत प्रश्नांसाठी हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरल्याने पालघर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित या महामोर्चाचे नेतृत्व अॅड. ओमकार सुधाकर पाटील यांनी केले. वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या आदिवासीबहुल तालुक्यांतील नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला.
तळपत्या उन्हात, पायाला बसणारे चटके आणि घशाला पडलेली कोरड सहन करत मोठ्या संख्येने आदिवासी महिला, युवक आणि ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले होते. “या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय”, “आदिवासींना न्याय मिळालाच पाहिजे”, “कुपोषण थांबवा”, “प्यायला पाणी द्या”, “हाताला काम द्या” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
मोर्चादरम्यान सादर करण्यात आलेल्या निवेदनात अनेक गंभीर प्रश्न मांडण्यात आले. जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यांमध्ये वाढते कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्याची मागणी करण्यात आली. दुर्गम भागांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशनची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.
मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत, स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून स्थलांतर थांबवण्यासाठी विशेष योजना राबवाव्यात, तसेच आदिवासी बांधवांचे प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढावेत, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. वारंवार होणारे भारनियमन थांबवून ग्रामीण भागातील कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या दूर करावी, अशीही मागणी करण्यात आली.
आरोग्य सुविधांबाबत उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टर, औषधे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी भात पिकाला हमीभाव जाहीर करावा आणि पीककर्ज प्रक्रिया सुलभ करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षक पदे भरून शिक्षणाचा दर्जा सुधारावा तसेच शाळांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. वाडा-विक्रमगड औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमुळे वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
मोर्चामध्ये विनायक राऊत, विलास पोतनीस, गिरीश राऊत, विकास मोरे, केदार दिघे, ज्योती ठाकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.
मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना केदार दिघे यांनी जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचार आणि कुपोषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. आदिवासी भागात आजही पाणी, वीज आणि आरोग्याच्या मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत, अशी टीका त्यांनी केली. तर ज्योती ठाकरे यांनी सरकारने पालघरमधील आदिवासींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास सरकारला “सळो की पळो” करून सोडू, असा इशारा दिला.
यावेळी जिल्हाप्रमुख ओमकार पाटील यांनी “जल, जंगल आणि जमीन यांचा समतोल राखल्याशिवाय आदिवासी समाज टिकणार नाही. शिवसेना आदिवासी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील,” अशी ग्वाही दिली.
मोर्चाचे आणखी एक आकर्षण म्हणजे विविध वेशभूषेत सहभागी झालेले कार्यकर्ते. गणपती, मारुती आणि नरसिंहाच्या वेशात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भगवे झेंडे, भगव्या टोप्या आणि सरकारविरोधी फलकांमुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.
या महामोर्चामध्ये प्रथमेश राऊत, दिलीप मोहोडकर, प्रमोद पाटील, निलेश पाटील, दिलीप बांडे, केदार दिघे, ज्योती ठाकरे, मनोज खरपडे, विकी लोखंडे, सौरभ अहिरे, भाऊ तेलंगे, वैष्णवी व्यापारी, चित्रांगण घोलप, साईनाथ नवले, निलेश फलटणकर, अभिषेक जाधव आणि लक्षित भोईर आदींचा समावेश होता.
शेवटी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने सुहास भागडे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.