सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या विधी महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी; पहिल्याच तुकडीतील २६ पैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण

Date: 2026-06-24
news-banner
नवयुग पालघर

**सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या विधी महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी; पहिल्याच तुकडीतील २६ पैकी २६ विद्यार्थी उत्तीर्ण**

             सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या विधी महाविद्यालयाने कायदा शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या पाच वर्षीय बी.एल.एस. एल.एल.बी. (२०२१–२०२६) अभ्यासक्रमाच्या पहिल्याच तुकडीने ( बॅच) अंतिम परीक्षेत १०० टक्के निकाल नोंदवला असून, सर्व २६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उल्लेखनीय यशामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
             महाविद्यालयाच्या पहिल्या तुकडीमधील विद्यार्थ्यांनी केवळ उत्तीर्ण होण्यापुरतेच मर्यादित न राहता गुणवत्तेची उंचीही गाठली आहे. मुल्ला माहेनूर रियाझ तय्यबा हिने ३२२१ गुण (७६.६९ टक्के) आणि ९.२७ संचयी श्रेणी गुणांक ( (सीजीपीआय) मिळवत प्रथम क्रमांक ( Rank I) पटकावला. शेख इस्रा अलीहसन शाझिया हिने ३१२२ गुण (७४.३३ टक्के) व ९.०३ संचयी श्रेणी गुणांक मिळवत द्वितीय क्रमांक (Rank II)मिळवला. तर चौधरी आर्या अश्विन धनश्री हिने २९१८ गुण (६९.४७ टक्के) व ८.५० संचयी श्रेणी गुणांक मिळवत तृतीय क्रमांक (Rank III) पटकावला.
             महाविद्यालयाच्या स्थापनेनंतरच्या पहिल्याच तुकडीने मिळविलेल्या या यशामुळे संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे अध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि संस्थेने उपलब्ध करून दिलेले दर्जेदार शैक्षणिक वातावरण महत्त्वाचे ठरल्याचे सांगण्यात आले.
              अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा, समृद्ध ग्रंथालय, मूट कोर्टसारख्या शैक्षणिक उपक्रमांची उपलब्धता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी निर्माण केली. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाल्याचे महाविद्यालय प्रशासनाने नमूद केले.
               यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोलेरा म्हणाल्या, "तुम्ही केवळ आमचे पदवीधर नाही, तर या अभ्यासक्रमाच्या वारशाचा मजबूत पाया आहात. यापुढील कायदा व्यवसायातही प्रामाणिकपणा, शिस्त आणि उत्कृष्टतेची परंपरा जपत समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करा. संस्थेला आपल्या पहिल्या बॅचचा नेहमीच अभिमान राहील."
             पालघर जिल्ह्यातील कायदा शिक्षण क्षेत्रात संस्थेने निर्माण केलेली गुणवत्ता आणि विश्वासार्हता यामुळे आगामी काळातही अशीच उल्लेखनीय यशाची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave Your Comments