**प्रामाणिकपणे जगायचं ठरवलं तर प्रत्येक पाऊल आणि उगवणारा प्रत्येक दिवस ही तुमची भूमिका ठरेल**

Date: 2026-06-24
news-banner
नवयुग पालघर विशेष

पालघर साहित्य व कला प्रतिष्ठान आणि मनोविकास प्रकाशन यांच्यातर्फे लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत सुप्रसिध्द अभिनेते व कवी किशोर कदम उर्फ सौमित्र यांची मुलाखत नाट्य दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर यांनी घेतली. सदर मुलाखत संक्षिप्त रुपात नवयुग पालघरच्या वाचकांसाठी येथे प्रसिध्द करत आहोत. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.

          **प्रामाणिकपणे जगायचं ठरवलं तर प्रत्येक पाऊल आणि उगवणारा प्रत्येक दिवस ही तुमची भूमिका ठरेल**


*कविता करण्याची सुरुवात केव्हा झाली ?*

 शाळेत असताना मी समुद्रावर अभ्यास करायला जात असे. एक दिवशी अभ्यासाचा कंटाळा आला तेव्हा मला कोणीतरी गात असल्याचा आवाज आला. त्या दिशेने मी गेलो तर एक व्यक्ती तानपुर्‍यावर रियाज करत असलेली दिसली. त्या व्यक्तीने मला बसायला सांगितलं आणि नंतर कविता करतो का असा प्रश्न विचारला. अर्थातच मी नाही असे उत्तर दिलं. त्यानंतर त्याने मला एक सुरावट गायला दिली. अनेकदा ती सुरावट गाऊन पाठ झाल्यावर, त्या व्यक्तीने मला त्या सुरावटीमध्ये शब्द टाकायला सांगितले. मी माझ्या परीने त्यात शब्द टाकले आणि त्या व्यक्तीने माझ्या शब्दासह ती सुरावट गायली. मी लिहीलेले गीत कोणीतरी गात आहे याचाच मला खूप आनंद झाला आणि तिथूनच माझ्या कविता करण्याची सुरुवात झाली.
 गालिब मला दु:खा एवढं मोठं व्हायचं आहे या कवितेबद्दल थोडसं....
 एका संवेदनशील कलावंतास जीवनाच्या एका टप्प्यावर आत्महत्येचे विचार मनात येत असतात. असा विचार मनात आल्यावर त्या व्यक्तीची कला त्याला परत मागे आणत असते. जेव्हा एखाद्या कलावंताला वाटते की आपल्यातील सुजनता संपली आहे तेव्हा तो आत्महत्येचा विचार करतो. माझ्या मनातही जेव्हा आत्महत्येचे विचार आले तेव्हा कवितेतील आजोबा म्हणजेच संत तुकाराम आणि गालिब यांची आठवण झाली, ज्यांनी अगणित दु:ख सहन करून मरेपर्यंत आयुष्य जगलं. आत्महत्या केली नाही. आणि जगणं सोडून पळाले नाही त्या दोघांना उद्देशून मी ही कविता केलेली आहे.

*आपल्या ...आणि तरीही मी व बाऊल ..या दोन कविता संग्रहामध्ये जवळपास १५ वर्षाच अंतर आहे. तटस्थपणे आपण याकडे कसे पाहता ?*

ऊन जरा जास्त आहे...., मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा बघ माझी आठवण येते का..... किंवा पाऊस पडून गेल्याने मन पागोळ्यागत झालं... या अशा ओळी आता मला नाही सुचणार. इतके कोवळे शब्द आणि त्या शब्दांचं कोवळं मन मी आता पकडू नाही शकणार. तो पाऊस कोवळा होता आताचा पाऊस निबर झाला आहे. वयानुसार वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे सुचतं. त्यावेळी आयुष्याकडे प्रामाणिकपणे पाहिले की लिहिण्यामध्ये एक सहजता येते तीच सहजता माझ्या आताच्या कवितांमध्ये दिसते.
एका गीता मागे तीस-पस्तीस हजार मानधन मिळत असताना कविता लिहिणं सोडणं हा एक धाडसी निर्णय घेण्याचं कारण काय ?
 मी चित्रपटासाठी किंवा मालिकांसाठी जेव्हा गाणी लिहत होतो तेव्हा दिग्दर्शक एक सिच्युएशन सांगत असत त्यानुसार गीते लिहिली जात असत. कधी कधी चालींवर ती लिहावी लागत तर कधी गीताना नंतर चाली लावली जात असे. पुढे पुढे सिच्युएशन दिल्यानंतरच कविता सुचू लागेल की काय अशी भीती वाटायला लागली, त्यावेळी कवितेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज वाटू लागली. तसेच पैसे घेऊन कविता लिहिणे या विरोधात एक झोड उठवली गेली होती या सर्व कारणांसह कवितेतील शब्द विकून पैसे कमावणे थांबवलं पाहिजे असा विचार माझ्या मनात आला आणि अडचण असतानाही मी गीत लिहिणे थांबविले.

       *कवी, आधी की अभिनेता ?*

 कालानुसार सांगायचं तर कवी आधी होतो. लोकांशी संवाद साधण्यात एक न्यूनगंड असतो, तेव्हा पुस्तक, वही आणि कागद जवळ येतो. अशाच प्रकारे मी कवी झालो. आपण कोणाला नको आहोत हा एक न्यूनगंड माझ्यात होता. नसिरुद्दीन शाह यांच्या म्हणण्यानुसार, चांगला अभिनेता हा अभिनेता तेव्हाच होतो जेव्हा त्याच्यात एक न्यूनगंड असतो. त्याला वाटतं आपण बोललेलं कुणीतरी ऐकावं, लोकांनी माझ्याकडे पहावं, लोकांच्या आकर्षणाचा मी केंद्रबिंदू व्हावं असं वाटत असतं. पण त्याला कम्युनिकेट करता येत नसतं तेव्हा तो अभिनेता व्हायचं ठरवतो. माझंही तसंच झालं असावं. ”या प्रश्नाला आता माझं उत्तर असतं जेव्हा मी कविता लिहित असतो तेव्हा मी कवी असतो आणि जेव्हा रंगमंचावर आणि कॅमेरा समोर असतो तेव्हा मी अभिनेता असतो.

*कौटुंबिक पाश्र्वभूमी नसताना या क्षेत्रात कसे आलात ?*

 माझे आजोबा तमासगीर होते आणि त्यांच्या जीवनात त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे माझे वडील त्यांचे घर सोडून मुंबईला आले होते. माझ्यापासून हा भूतकाळ लपवलेला होता. मी जेव्हा कलाकार होण्याचं ठरवलं तेव्हा मला घरातून विरोध झाला परंतु मी मागे हटलो नाही आणि जेव्हा मला माझ्या आजोबांबद्दल कळलं तेव्हा आजोबांच्या रक्तातील कलावंतपण माझ्यात आलं आहे असे वाटून माझ्यात एक आत्मविश्वास आला आणि त्या रक्तात अप्रत्यक्षपणे वाहत असलेल्या आत्मविश्वासामुळेच मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे असे मला वाटतं.

*जोगवा हा चित्रपट कसा मिळाला त्याबद्दलचा किस्सा काय आहे ?*
 त्या काळात मला काम मिळत नव्हतं. दिग्दर्शक राजू पाटील यांच्या मनात माझ्याबद्दल एक कसला तरी राग होता आणि त्या रागातूनच मला त्यांनी ही भूमिका दिली होती असे मला त्यावेळी वाटत असे. पण त्यानंतर राजू माझा खूप जवळचा मित्र झाला. साडी नेसून काम करण्याची एक तृतीयपंथीयाची भूमिका होती. कामाची व पैशाची गरज असल्याने मी ती भूमिका स्वीकारली. चित्रीकरण दरम्यान तृतीयपंथी आम्हाला काही गोष्टी शिकविण्यासाठी येत होते. माझी भूमिका लहान होती आणि भूमिकेबद्दल मी अति आत्मविश्वासामध्ये होतो. परंतु जेव्हा प्रत्यक्ष साडी नेसण्याची वेळ आली आणि परकर नेसून मी स्वत:ला आरशात पाहिलं तेव्हा ही भूमिका मी काय सिद्ध करण्यासाठी करतोय असा प्रश्न पडला. मला खूप अपमानास्पद वाटलं आणि सेटवरून पळून जाण्याचा विचार आला. मनात हे द्वंद सुरू असतानाच मेकअप करण्यासाठी बसलो. काही तासांनी मेकअप झाल्यावर तृतीय पंथाचा मेकअप पाहून माझ्यात एक वेगळीच भावना निर्माण झाली. आणि मी भूमिका करण्याचे निश्चित केले. साडीमुळे चालण्यास मला अडचण येत होती त्याच्यामुळे चालण्याचा सराव केला. हळूहळू बाईपण झिरपायला लागलं. दुसर्‍या दिवसापासून सकाळी सात वाजल्यापासूनच सराव हवा म्हणून साडी नेसून वावरायला लागलो. माझं शूटिंग संपलं त्यानंतरही तीन दिवस मी तेथेच थांबलो हितो. दिग्दर्शकाने मला याबद्दल विचारलं तेव्हा मी परकराच्या नाडीचा वळ माझ्या पोटावरून जात नसल्याचं कारण सांगितलं. कारण अशी भूमिका करणार हे घरी सांगितलं नव्हतं. या भूमिकेमुळे, ज्या पुरुषाला त्याच्या पौरुषत्वाचा अहंकार आहे त्याने घरात कोणी नसताना परकर, पोलकं, साडी नेसून पाहायला हवी. जेणेकरून बाईला काय वाटतं याची त्याला थोडी तरी कल्पना येईल हे मी या भूमिकेतून शिकलो.

*अरुण खोपकर यांनी नारायण सुर्वे यांची भूमिका दिली त्याबद्दल....*
 मी स्वत:ला खूप नशीबवान समजतो की माझ्या चेहर्‍यात अनेकांना विविध लोक दिसली. चेतन दातार यांना डॉ. आंबेडकर दिसले, चंद्रकांत कुलकर्णी यांना महात्मा गांधी यांचा मुलगा हरिलाल, अमोल पालेकर यांना रं. धो. कर्वे, नागराज मंजुळे याला गृहमंत्री, बापट आणि अरुण खोपकर यांना नारायण सुर्वे दिसले. ज्या नारायण सुर्वे यांनी केवळ १३९ कविता लिहिल्या आणि त्या १३९ कवितांवर २९ पीएचडी केल्या गेल्या अशा एका मोठ्या कवीचं काम करण्याचा भाग्य मला मिळालं. त्यातही नारायण सुर्वे यांच्यासोबत प्रत्यक्ष दोन महिने मी राहिलो. त्यांच्याबरोबर ते ज्या परिसरात वावरले, ज्या कारखान्यात कामाला होते तेथे त्यांच्यासोबत वावरलो हा एक समृद्ध काळ माझ्या दृष्टीने होता.
अभिनय कारकिर्दीतील विविध टप्प्यांकडे कोणत्या भावनेने पाहता
  मी अनेक दिग्दर्शकांकडे काम केलं. प्रत्येक दिग्दर्शकांकडून काही नवीन जगायला मिळते. प्रत्येक कलावंत त्याचं वैयक्तिक आयुष्य प्रामाणिकपणे जगल्यानंतर तो समृद्ध होत जातो. विविध दिग्दर्शकांसोबत काम करण्याचं आणि महत्त्वाची भूमिका करण्याचं भाग्य मला मिळालं या सगळ्यांकडून मी काही ना काही शिकलो आहे. मी केलेल्या कोणत्याही भूमिकेची तयारी ही माझ्या सुरुवातीच्या एकांकिकेपासून सुरू झाली आहे. एकांकिका, नाटक, चित्रपट यातील अनुभव हा कणाकणाने झिरपत आणि महत्त्वाचं असेल ते टिकवत त्या त्या भूमिका पर्यंत आलेला असतो. असं मला वाटतं.

*एकाच वर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले त्याबद्दल....*
 समर, नटरंग, फॅन्ड्री, ध्यासपर्व अशा चार-पाच चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याची मला अपेक्षा होती. पण त्यावेळी तो मिळाला नाही. मात्र राष्ट्रीय पुरस्कार मिळवणे हेच कलावंतांचे ध्येय नसते. आपण काम करीत राहतो आणि कधीतरी तो आपल्याला मिळतो. एके दिवशी मलाही तो मिळाला, आणि हे मला न्यूज चॅनलकडून कळालं. अवांच्छित आणि गोदाकाठ या दोन चित्रपटासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यावेळी मी समुद्रावर एकटाच फिरत होतो आणि मला त्यावेळी खूपच एकटं वाटत होतं.
दिग्दर्शनाबद्दल आपलं काय मत आहे
 कोणत्याही चांगल्या अभिनेत्याला शेवटी दिग्दर्शक व्हावंसं वाटतं आणि तेच त्याचं अंतिम ध्येय असतं. खूप वर्षापासून मला दिग्दर्शन करायचं होतं. रंगनाथ पठारे यांच्या कथेवर दहा वर्षांपूर्वी मी चित्रपट दिग्दर्शित करायला सुरुवात केली. मात्र काही कारणास्तव तो पूर्ण होऊ शकला नाही. आता पुन्हा एकदा नव्याने त्याच पटकथेवर काम करतोय लवकरच चित्रपट आपल्या भेटीस येईल.

*आपलं आडनाव कदम नसतं तर....*
 या विषयावर जाहीर बोलत नाही परंतु आपण जे करतो ते आपलं काम बोलत असतं. मी आज जो कोणी आहे तो माझ्या कामामुळे आहे. मी सुपरस्टार नसेल, परंतु असा अभिनेता आहे जो कविता करतो आणि अभिनयातून कविते सारखं पात्र रंगवू शकतो. असा मी एकटा आहे, हे माझं वेगळेपण आहे. तुम्ही सवर्ण असा की बहुजन... व्यवस्था तुमच्या विरोधात काम करतच असते. तुम्ही फक्त त्याचा विचार करत कलेकडे पहात राहिलात तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

     *कलावंताने राजकीय भूमिका घ्यावी का ?*
 कलावंताने जाहीर भूमिका घेण्याची गरज नसते असं मला वाटतं. तुमची प्रत्येक कृती ही तुमची भूमिका असते. माझं पालघरला येणं, खोदलेल्या रस्त्यावरून चालताना शिव्या देणं, बातम्या पाहताना अस्वस्थ होणे ही सुद्धा एक भूमिका असते. प्रत्येक वेळी तुम्हाला नेता बनून, एखाद्या पक्षाशी जोडून घेऊन जाहीर मूर्खासारखं स्टेटमेंट देऊन स्वत:ला ट्रोल करून घेऊन ही माझी भूमिका आहे असं दाखविण्याची गरज नसते. तुम्हाला प्रामाणिकपणे माणूस म्हणून जगायचं असेल तर तुमचं पडणारं प्रत्येक पाऊल, उगवणारा प्रत्येक दिवस ही तुमची भूमिका आहे असं मला वाटतं.

*आजच्या सामाजिक व्यवस्थेकडे कसे पाहता ?*
 आजची व्यवस्था ही अस्वस्थ करणारी आहे. आपण सगळ्यांनी जास्त जागरूक राहायला हवं, आणि विचार करायला हवा. ज्या माध्यमांचं आक्रमण आपल्यावर लादलं जातंय त्या माध्यमांकडे सजगतेने पाहायला हवं. कोणती बातमी खरी, कोणती खोटी ? कोणती बातमी पेरलेली आणि कोणती दाबलेली ? कोणती मुद्दाम आणलेली याबद्दल आपण जागरूक राहायला हवं असं मला वाटतं. (शब्दांकन : अभिनय मोरे )

Leave Your Comments