धानीवारी अपघातातील जखमींमध्ये सुधारणा; ४ रुग्ण डिस्चार्ज, ५ जण मुंबईतील विशेष रुग्णालयांत हलवले

Date: 2026-06-03
news-banner
नवयुग पालघर : 

**धानीवारी अपघातातील जखमींमध्ये सुधारणा; ४ रुग्ण डिस्चार्ज, ५ जण मुंबईतील विशेष रुग्णालयांत हलवले**

              मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धानीवारी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर उपचार सुरू असलेल्या जखमींमध्ये आता लक्षणीय सुधारणा दिसून येत आहे. पालघर जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जखमींच्या प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती जाहीर करत, बहुतांश रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. प्रशासनाच्या तत्पर हालचाली, आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात यश आले.

           अपघातातील १७ जखमींपैकी ४ रुग्णांना २१ मे रोजी उपचारानंतर सुरक्षितपणे घरी पाठविण्यात आले आहे. तर पुढील विशेष वैद्यकीय उपचारांसाठी ५ रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत मुंबईतील नामांकित धर्मादाय रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. उर्वरित
 ८ जखमींवर वेदांता रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांनाही आज डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
अपघातानंतर शासनाने जखमींच्या उपचारांची पूर्ण जबाबदारी स्वीकारली असून सर्व वैद्यकीय खर्च प्रशासनाकडून उचलला जात आहे. रुग्ण पूर्णपणे बरे होईपर्यंत आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

              घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. आतापर्यंत सर्व १३ बाधित कुटुंबांना मदतीची रक्कम वितरित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, वनमंत्री व पालकमंत्री गणेश नाईक यांनी अपघाताच्या दिवशी वेदांता रुग्णालयाला भेट देत जखमींची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाला जखमींना सर्वोत्तम उपचार आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी १९ मे रोजी जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेत बाधित कुटुंबांच्या पुनर्वसन आणि दीर्घकालीन गरजांवर चर्चा केली. प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अपघातानंतर जिल्हा प्रशासन, स्थानिक पोलीस, आरोग्य विभाग आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले होते.

             विशेष उपचारासाठी मुंबईतील धर्मादाय रुग्णालयांत हलविण्यात आलेल्या रुग्णांमध्ये पवित्रा दांडेकर (के. जे. सोमय्या), कुणाल रावटे (वाडिया), संतोष लाखात (जे. जे.), राधा वळवी (के. ई. एम.) आणि निवराज शेंडे (सेंट जॉर्ज) यांचा समावेश आहे.

          उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये कृष्णा लाखात, शरद कुरहाडा, शिवराम वळवी आणि रूपेश लाखात यांचा समावेश आहे.

            तर वेदांता रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये विजया दांडेकर, संजय लाखात, लाखमा खेवरा, अवधेश कुमार, अजित लाखात, अनुसया लाखात, माधुरी लाखात आणि लाडकी लाखात यांचा समावेश आहे.

Leave Your Comments