पालघर जिल्ह्यात श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षण जनजागृती अभियानाचा आरंभ

Date: 2026-07-04
news-banner
नवयुग पालघर

**पालघर जिल्ह्यात श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षण जनजागृती अभियानाचा आरंभ**

                जिल्ह्यातील रोजगार, बेरोजगारी आणि असंघटित क्षेत्रातील उद्योगांची अचूक माहिती संकलित करून विकास नियोजन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय सर्वेक्षणांच्या जनजागृती अभियानाचा आरंभ पालघर येथे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आला.
              कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या दोन्ही सर्वेक्षणांसाठी तयार करण्यात आलेल्या माहितीपत्रके, पोस्टर्स आणि प्रचार साहित्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी राजू ढोकणे, सांख्यिकी अधिकारी (अ.का.) भगवान पवार तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

          यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी, नियतकालिक रोजगार व श्रमस्थिती सर्वेक्षणाद्वारे (Periodic Labour Force Survey) कुटुंबातील सदस्यांची रोजगारस्थिती, बेरोजगारी, कामाचे स्वरूप, कामाचे तास, श्रमशक्तीतील सहभाग दर तसेच शिक्षण आणि वयोगटानुसार रोजगाराची सद्यस्थिती याची माहिती गोळा केली जाणार असल्याचे सांगून या माहितीच्या आधारे रोजगार क्षेत्रातील बदल, बेरोजगारीचे प्रमाण आणि रोजगाराच्या संधींचे विश्लेषण करता येणार असल्याची माहिती दिली .

             तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांचे वार्षिक सर्वेक्षणातून (Annual Survey of Unincorporated Sector Enterprises) असंघटित क्षेत्रातील सूक्ष्म व लघुउद्योग, व्यापार, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील आस्थापनांची माहिती संकलित केली जाणार आहे. या सर्वेक्षणातून असंघटित क्षेत्रातील उद्योगांची सद्यस्थिती, रोजगारनिर्मिती, उत्पादनक्षमता आणि स्थानिक अर्थव्यवस्थेतील योगदान यांचा अभ्यास होणार आहे.
जिल्हा, राज्य आणि देशाच्या विकासासाठी अचूक व विश्वासार्ह सांख्यिकीय माहिती अत्यंत महत्त्वाची असून, रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि विविध लोककल्याणकारी योजनांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी या सर्वेक्षणांचा मोठा उपयोग होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

        या सर्वेक्षणासाठी शासनाने नियुक्त केलेले अधिकृत अन्वेषक निवडक कुटुंबे व व्यावसायिक आस्थापनांना भेट देऊन माहिती संकलित करणार आहेत. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असून तिचा वापर केवळ शासकीय सांख्यिकीय आणि नियोजनात्मक उद्देशासाठीच केला जाणार आहे.
          “आपली माहिती – विकास नियोजनाचा पाया” या संदेशासह जिल्ह्यातील सर्व नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि असंघटित क्षेत्रातील घटकांनी या सर्वेक्षणात सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी केले.

   चौकट//
 "विकसित भारत @ २०४७ नुसार जिल्हा हे विकासाचे मध्यवर्ती केंद्र आहे. त्याकरिता जिल्हास्तरीय रोजगार-बेरोजगार आकडेवारी, असंघटित क्षेत्रातील उद्योगांची संख्या तसेच रोजगार निर्मिती इत्यादी निर्देशकांची सविस्तर सांख्यिकी माहिती आवश्यक आहे. या दोन्ही सर्वेक्षणाद्वारे निर्माण होणारी माहिती राज्य व जिल्हा उत्पन्न अंदाज तयार करण्यास आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व धोरणे निश्चित करण्यास अत्यंत उपयुक्त ठरेल".
           ------ अर्थ व सांख्यिकी आयुक्त डॉ. ज्योत्स्ना पडियार 

            या सर्वेक्षणातून प्राप्त होणारी आकडेवारी ग्रामपातळी, जिल्हा आणि विभाग स्तरावरील धोरण निर्मितीसाठी पाया ठरणार आहे. 
      ------गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे

Leave Your Comments