नवयुग पालघर
**मानसपुत्र मानलेल्या नगरसेवकांवर तत्कालीन जिल्हाधिकार्यांकडून निधीचा वर्षाव**
पालघर जिल्ह्याला यापूर्वी लाभलेले जिल्हाधिकारी गोविंद बोडके तसेच माणिक गुरसळ यांनी पालघर नगरपरिषदेचे तत्कालीन व विद्यमान नगरसेवक अमोल प्रकाश पाटील तसेच तत्कालीन नगरसेवक सुभाष विष्णू पाटील यांना मानसपुत्र मानल्याची माहिती समोर आली असून हा गौप्यस्फोट इतर कोणी नाही तर दस्तुरखुद नगरसेवक अमोल प्रकाश पाटील यांनी केला आहे. स्थायी समितीच्या
३० जानेवारी रोजीच्या सभेत त्यांनी (अभिमानाने?)ही माहिती सांगितली आहे.
पालघर नगरपरिषदेच्या तातडीच्या स्थायी समितीच्या विशेष सभेच्या इतिवृत्तात ही बाब नमूद करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वत:च्या निधीची कमतरता भासते असे नमूद करत, मागील २३ वर्षांपूर्वी नगरपालिकेला न येणारा निधी मी स्वत: व माजी नगरसेवक सुभाष पाटील अशा आमच्या प्रयत्नाने त्यावेळचे जिल्हाधिकारी माणिकरावसर व बोडकेसर यांनी आम्हाला मानसपुत्र म्हणूनच मान केला आणि आम्हीही त्यांना मानस वडील म्हणूनच मानत होते. त्यामुळे प्रचंड प्रमाणात निधी आला व जागा आपल्या नावावर झाल्या असे त्यांनी म्हटल्याचे इतिवृत्तात नमूद केले आहे.
अमोल पाटील इथवरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढे जाऊन... आणि शासनाकडूनही आम्ही काही स्रोत वापरून चांगल्या प्रकारे निधी आणल्याचेही म्हटले आहे. अमोल पाटील यांनी नंतर पुढे सध्याचे नवीन नगराध्यक्ष उत्तम घरत यांचे कौतुक केले आहे. अमोल पाटील म्हणतात,.. आम्हाला सांगायला आनंद वाटतो की, आमचे बघून नगराध्यक्षांनी एवढा निधी आणला की आम्हा सर्वांना मागे टाकले. अमोल पाटील म्हणतात, त्यांच्यामध्ये कुवत आहे फक्त त्यांनी ती त्या त्यावेळी वापरली नव्हती. फक्त पालघर शहरापुरतेच मर्यादित राहिले होते. ते त्यावेळी.आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही पालघर शहरापुरतेच नाहीयेत तुम्ही जिल्ह्याचे नाही तर राज्याचे नेते आहात त्यामुळे खरोखरच त्यांनी निधी आणला नाही तर इमारत होणे शक्य नव्हते.
२८ कोटी आणले, पाणीपुरवठा १८ कोटी आणणे, पाच कोटी, दहा कोटी असे विविध निधी आणले तेव्हा यापुढे असाच निधी ते आणतील कारण नगरविकास खातेच आपल्या मंत्री साहेबांकडे आहे असेही अमोल पाटील यांनी पुढे म्हटले आहे.आणि त्यामुळे हे सहज शक्य होणार आहे, असे ते म्हणतात.
तत्कालीन जिल्हाधिकारी माणिक गुरसळ आणि गोविंद बोडके यांचे जिल्ह्यात हे दोघेच मानसपुत्र होते की आणखी कोणी मानसपुत्र होते याचा शोध या निमित्ताने घ्यावा लागेल. तसेच या दोघांनाच विशेष निधी देण्यामागचे कारण काय याचेही उत्तर शोधावे लागेल .