नवयुग पालघर
**** गळ्याभर पाण्यातून गर्भवतीची सुटका... देवीपाड्यावर ६ जुलैची काळरात्र****
**महापुराने उद्ध्वस्त झाले ३७ कुटुंबांचे संसार; चंदू लिलका यांचे घर कोसळले, मदतीसाठी माणुसकी धावली**
केळवे रोड, दि. ६ (संजय पाटील मायखोपकर)
घराभोवती वेगाने वाढणारे पाणी... काही क्षणांत घरात शिरलेला महापूर... हाताशी जे मिळेल ते घेऊन घराच्या छतावर चढलेली कुटुंबे... आणि त्याच वेळी गळ्याभर पाण्यातून प्रसूतीवेदनांनी विव्हळलेल्या गर्भवती महिलेची जीवावर उदार होऊन केलेली सुटका... ६ जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील केळवे रोड परिसरातील देवीपाडा आणि आसपासच्या गावांनी हा थरार प्रत्यक्ष अनुभवला. या महापुराने केवळ घरेच वाहून नेली नाहीत, तर अनेक कुटुंबांच्या आयुष्यभराची कमाई काही तासांत उद्ध्वस्त करून टाकली.
मुसळधार पावसानंतर ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आणि देवीपाडा गाव पूर्णपणे पाण्याखाली गेले. अनेक नागरिकांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरांच्या छतांवर आश्रय घ्यावा लागला. घरांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे अन्नधान्य, कपडे, फर्निचर, विद्युत उपकरणे आणि संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले.
महापुराचा सर्वाधिक फटका चंदू लिलका यांच्या कुटुंबाला बसला. त्यांचे घर पूर्णपणे कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र
पुन्हा नव्याने संसार उभा करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
*पूरात जन्माला आले आशेचे किरण*
महापुराच्या दिवशीच गर्भवती प्रियंका यादव यांना प्रसूतीवेदना सुरू झाल्या. सर्वत्र पाणी असल्याने रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकत नव्हती. अशा वेळी आशा सेविका तत्काळ त्यांच्या घरी पोहोचली.
आगरी सेनेचे पालघर उपाध्यक्ष चेतन गावड, सोन्या पाटील, तेजस शिंदे, लक्ष्मीताई आणि इतर तरुणांनी दरवाजाचे तात्पुरते स्ट्रेचर तयार करून गळ्याभर पाण्यातून प्रियंका यादव यांना मुख्य रस्त्यापर्यंत आणले. चेतन गावड यांच्या वाहनातून त्यांना मायखोप आरोग्य उपकेंद्रात नेण्यात आले. तेथे परिचारिका सोनल पाटील, सेविका वर्षा पाटील, शिल्पा सातपुते आणि अंगणवाडी कार्यकर्त्या रेश्मा किणी यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर योगेश भुपेश यांच्या प्रयत्नातून रात्री उशिरा रुग्णवाहिका उपलब्ध झाली आणि सफाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची सुखरूप प्रसूती होऊन पुत्ररत्नाचा जन्म झाला. संकटाच्या काळात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य
*कर्मचाऱ्यांनीही उल्लेखनीय सेवा बजावली.
गावे पाण्याखाली, शेतीचेही मोठे नुकसान*
वाकसई चक्कीपाड्यात सुमारे ४० घरांमध्ये पाणी शिरले, तर मायखोप हनुमानपाडा परिसरात चार फूट पाणी साचले होते. पुरानंतर हनुमान मंदिर परिसरात साचलेला गाळ आणि दगड स्थानिक युवकांनी स्वतः उतरून हटवले.
वाकसई, बदाठे, झांजरोळी, नवीनपाडा, मायखोप आणि परिसरातील इतर पाड्यांमध्ये पेरलेले भात बियाणे तसेच भाजीपाला पिकेही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
*३७ कुटुंबांवर संकट*
या पुरामुळे किमान ३७ कुटुंबांना मोठा फटका बसला. त्यामध्ये गणेश तांडेल, सदा मस्कर, सुनील मस्कर, दिलीप मस्कर, गोविंद बुधवलेकर, सुरेश काठे, हेमंत गोवारी, रवी राठोड, मधू राठोड, उमेश लिलका, अनुसया, अंकुश लिलका, विष्णू बर्फ, परशुराम बर्फ, वासंती, मनोहर लिलका, प्रदीप लिलका, विजय लिलका, सचिन गोवारी, किसन गोवारी, विष्णू गोवारी, मंगेश रिंजड, अजय म्लावकर, सुरेश मस्कर, दत्ता लिलका, जयश्री साबरे, दिनेश बाबर, नंदकुमार साबरे, चंदू लिलका, राजेश भोईर, विशाल पाटील, संतोष चिपाट, मनोज पाटील, बाळाराम वेडगा, करण पाटील आणि कमलाकर किणी यांच्या कुटुंबांचा समावेश आहे.
*पंचनामा झाला; मदतीची प्रतीक्षा कायम*
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार शासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत; मात्र अद्याप कोणतीही आर्थिक मदत किंवा नुकसानभरपाई मिळालेली नाही.
दुसरीकडे आगरी सेना आणि परिसरातील दानशूर नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, बिछाने, चादरी तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. विशेष म्हणजे, मदत करताना पुरग्रस्तांचा स्वाभिमान जपण्यासाठी कोणतेही सेल्फी किंवा प्रसिद्धीसाठी छायाचित्रे काढण्यात आली नाहीत.
महापुराने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले; पण संकटाच्या काळात एकमेकांच्या मदतीला धावून जाणारी माणुसकी, जीव धोक्यात घालून केलेले बचावकार्य आणि पुरग्रस्तांचा सन्मान जपत केलेली मदत यामुळे देवीपाड्याच्या या वेदनादायी कहाणीला आशेचीही किनार लाभली आहे. साहित्यिक संजय पाटील मायखोपकर यांनीही आपल्या यूट्यूब चॅनेलद्वारे पुरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले आहे.