पालघर जिल्ह्यात तीन गुन्ह्यांची उकल; खुनाचा प्रयत्न, मंगळसूत्र चोरी आणि दुचाकी चोरीप्रकरणी चार आरोपी अटकेत

Date: 2026-10-06
news-banner


नवयुग पालघर
****पालघर जिल्ह्यात तीन गुन्ह्यांची उकल; खुनाचा प्रयत्न, मंगळसूत्र चोरी आणि दुचाकी चोरीप्रकरणी चार आरोपी अटकेत****

पालघर : पालघर जिल्ह्यात खुनाचा प्रयत्न, महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावणे आणि दुचाकी चोरी अशा तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. बोईसरमधील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तिघांना, मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्यात एका सराईत गुन्हेगाराला, तर तलासरीतील दुचाकी चोरीच्या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे या कारवाया करण्यात आल्या असून चोरीचे दागिने, हातोडा आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

*बोईसरमध्ये व्यावसायिकावर हातोड्याने हल्ला; तिघांना अटक*
बोईसर पूर्व येथील दांडिपाडा परिसरात एका व्यावसायिकावर लोखंडी हातोड्याने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पाठक चाळ, दांडिपाडा, बोईसर पूर्व येथे राहणारे हर्षनाथ ब्रह्मदेव तिवारी (वय ३९) यांचे सँडविच विक्रीचे दुकान आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या दुकानाशेजारी कपड्यांचे दुकान सुरू करण्यासाठी जागा घेतली होती. मात्र, त्या ठिकाणी टॅक्सी थांबा असल्याचे सांगून तिवारी यांनी त्याला दुकान सुरू करू नको, असे सांगितले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून संबंधित व्यक्तीने आपल्या दोन साथीदारांसह २१ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तिवारी यांच्या दुकानावर येऊन त्यांना मारहाण केली.

यावेळी तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर त्यांच्यापैकी एकाने लोखंडी हातोड्याने तिवारी यांच्या डोक्यावर, डाव्या गालावर आणि डाव्या कानावर वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी २२ सप्टेंबर रोजी बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१), ११५ (२) आणि ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा आणि बोईसर पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे सुनिलकुमार जादुगर पहलवान (वय २८), हिमांशू राजेशकुमार मिश्रा (वय २६) आणि शुभम माताचरण दुबे (वय ३०), तिघेही राहणार गणेशनगर, बोईसर पूर्व, मूळ उत्तर प्रदेश, यांना २४ सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. तपासात या तिघांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. हल्ल्यासाठी वापरलेला हातोडा आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे करीत आहेत.

*महिलेचे २० हजारांचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत गुन्हेगार अटकेत*
बोईसर परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून येऊन हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला पालघर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. चोरीला गेलेले मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली स्कुटी पोलिसांनी जप्त केली आहे.

वारांगडे, तळेकरपाडा येथे राहणाऱ्या संगिता संजय गोलीम (वय ३५) या २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी महागाव रस्त्यावरून पॉवर ग्रिडसमोरून पायी घरी जात होत्या. त्यावेळी काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा स्कुटीवरून आलेल्या अंदाजे ३० ते ४० वयोगटातील एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सुमारे २० हजार रुपये किमतीचे, दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून पळ काढला.

याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि बोईसर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे बोईसर पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार प्रदीप सोमनाथ बॅनर्जी (वय ५०), राहणार यादव नगर, बोईसर पूर्व, मूळ पश्चिम बंगाल, याला २६ सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने २९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. त्याच्याकडून चोरीला गेलेले २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली स्कुटी जप्त करण्यात आली.
या गुन्ह्याचा पुढील तपास बोईसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव राठोड करीत आहेत.

*तलासरीत दुचाकी चोरी; २४ तासांत आरोपीला अटक*
तलासरी येथील स्टेट बँकेसमोरील वाहनतळातून स्कुटी चोरून नेणाऱ्या आरोपीला तलासरी पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक करून चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.

दादरा नगर हवेली येथील चिसदा, मुरडोलपाडा येथे राहणारे मुकेश धाकू नडगे (वय २३) हे १ ऑक्टोबर रोजी तलासरी येथील स्टेट बँकेत आले होते. त्यांनी आपली सुझुकी कंपनीची हिरव्या-पांढऱ्या रंगाची स्कुटी (क्रमांक DD-01 F-4144) बँकेसमोरील वाहनतळात उभी केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमतीशिवाय स्कुटी चोरून नेली. याप्रकरणी तलासरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच तलासरी पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील उमरगाव तालुक्यातील नारगोल येथील अजय मनोहर मायावंशी (वय ३६) याचा या चोरीतील सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला अटक करून चोरीची स्कुटी हस्तगत करण्यात आली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता ३ ऑक्टोबर रोजी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सचिन आव्हाड करीत आहेत.

*स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांची संयुक्त कामगिरी*
या तिन्ही गुन्ह्यांच्या तपासात पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि संबंधित विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई केली.

बोईसरमधील खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत, दीपक राऊत, संदीप सूर्यवंशी, संदीप सरदार, कैलास पाटील, दिनेश गायकवाड, कपिल नेमाडे, संजय धांगडा, कल्याण केंगार, प्रशांत निकम आणि वैभव जामदार यांनी सहभाग घेतला.

मंगळसूत्र चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ राठोड, संदीप सूर्यवंशी, कैलास पाटील, संजय धांगडा, कल्याण केंगार, प्रशांत निकम आणि वैभव जामदार यांनी कामगिरी बजावली.

तलासरीतील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव आणि तलासरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास दरगुडे, सहाय्यक फौजदार हिरामण खोटरे आणि अनिल सोनवणे यांनी कारवाई केली.

#Palghar #PalgharPolice #CrimeNews #Boisar #Talasari #CrimeDetection #PoliceAction #PalgharNews #NavyugPalghar #नवयुगपालघर #पालघरपोलीस #गुन्हेउकल #बोईसर #तलासरी #गुन्हेगारी
navyugpalghar.com


 

 

Leave Your Comments