पालघर जिल्ह्यात २१ ठिकाणी रोजगार मेळावे; केवळ२२६ उमेदवारांची निवड*

Date: 2026-10-02
news-banner

नवयुग पालघर 
***पालघर जिल्ह्यात २१ ठिकाणी रोजगार मेळावे; केवळ२२६ उमेदवारांची निवड***

पालघर : पालघर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या महत्वाकांक्षी २१ रोजगार मेळाव्यांमधून केवळ२२६ उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे अंतिम निवड करण्यात आली. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने हे मेळावे आयोजित करण्यात आले होते.

या रोजगार मेळाव्यांमध्ये पालघर जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील विविध कंपन्यांनी सहभाग घेतला. उत्पादन, सेवा, वाहतूक व साठवणूक, हॉटेल व्यवसाय, बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, वाहन उद्योग आणि किरकोळ विक्री अशा विविध क्षेत्रांतील कंपन्यांनी रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभव यानुसार निवड प्रक्रिया राबविण्यात आली. एकाच ठिकाणी विविध कंपन्यांशी संपर्क साधून थेट मुलाखत देण्याची संधी मिळाल्याने रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना या मेळाव्यांचा लाभ झाला असला तरी लाभार्थ्यांची संख्या खूप कमी आहे.

जिल्ह्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी कौशल्य विकास आणि रोजगार यांची सांगड घालण्यावर या उपक्रमातून भर देण्यात आला. बदलत्या औद्योगिक गरजांनुसार युवकांना तांत्रिक कौशल्यांसह संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रशिक्षण देण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

बोर्डी, तलासरी, चिंचणी, पास्थळ, पालघर, वसई, विरार, ओंदे, जव्हार, वाडा, मोखाडा, गालतरे आणि वाणगाव यांसह जिल्ह्यातील विविध भागांतील शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमध्ये या रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच कौशल्य प्रशिक्षण आणि उद्योगांच्या मनुष्यबळाच्या गरजा यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

#पालघर #रोजगारमेळावा #रोजगारमहाकुंभ #पालघरजिल्हा #युवकांसाठीरोजगार #रोजगारसंधी #कौशल्यविकास #बेरोजगारयुवक #थेटमुलाखत #महाराष्ट्र #NavyugPalghar


Leave Your Comments