पालघरच्या पर्यटन विकासासाठी नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अ‍ॅग्रीकल्चर आणि दांडेकर महाविद्यालयाचा पुढाकार; रील स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

Date: 2026-10-02
news-banner

नवयुग पालघर
***पालघरच्या पर्यटन विकासासाठी नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अ‍ॅग्रीकल्चर आणि दांडेकर महाविद्यालयाचा पुढाकार; रील स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव***

पालघर : पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अ‍ॅग्रीकल्चर (NKCCA) आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. २६ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमाला पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अ‍ॅग्रीकल्चर यांच्यात झालेल्या समन्वय कराराच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा भाग म्हणून पर्यटन विकास, डिजिटल माध्यमांचा वापर, विद्यार्थी सहभाग आणि स्थानिक उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अ‍ॅग्रीकल्चर मार्फत सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी संस्थेकडून होत असलेल्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना व्यापक व्यासपीठ मिळेल आणि स्थानिक पातळीवर रोजगार व व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष निमिष सावे यांनी पालघर जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या आणि प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. पर्यटनासोबत तंत्रज्ञान, डिजिटल माध्यमे, विद्यार्थी सहभाग, संशोधन आणि उद्योजकता यांची सांगड घालून पालघर आणि उत्तर कोकणातील पर्यटनस्थळांना अधिक व्यापक प्रसिद्धी देण्याची संस्थेची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले. पर्यटन तज्ज्ञ राजेश नांबियार यांनी विशेष मार्गदर्शन सत्रात पर्यटन क्षेत्रातील बदल, पर्यावरणपूरक पर्यटन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यटन क्षेत्रातील नव्या संधी यांविषयी माहिती दिली. निमिष सावे यांनीही उपस्थित विद्यार्थी आणि मान्यवरांना पर्यटन क्षेत्रातील भविष्यातील संधी तसेच पालघर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाच्या विविध शक्यतांबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात उत्तर कोंकण पर्यटन रील स्पर्धा २०२६ (North Konkan Tourism Reel Competition 2026) या चित्रफीत स्पर्धेतील विजेत्यांचा जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या स्पर्धेत सचिन व्ही. यांनी प्रथम क्रमांक पटकावत ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले. अचला मोरे यांनी द्वितीय क्रमांक मिळवत ३० हजार रुपये, तर सार्थक बाबर यांनी तृतीय क्रमांक मिळवत २० हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.

स्पर्धेतील अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या पहिल्या २५ स्पर्धकांनाही प्रमाणपत्रे, भेटवस्तूंच्या पिशव्या आणि विशेष सवलत प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेच्या माध्यमातून पालघर आणि उत्तर कोकणातील निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे, स्थानिक संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि अद्याप व्यापक प्रसिद्धी न मिळालेल्या पर्यटनस्थळांची माहिती डिजिटल माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. चित्रफितींच्या माध्यमातून पर्यटनस्थळांचे सादरीकरण करून नव्या पिढीला पर्यटन क्षेत्राशी जोडण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.

जिल्हाधिकारी कार्यालय, नॉर्थ कोकण चेंबर ऑफ कॉमर्स अँड अ‍ॅग्रीकल्चर आणि शैक्षणिक संस्थांच्या समन्वयातून पर्यटन विकासासोबतच डिजिटल नवनिर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्ता, विद्यार्थी संशोधन, नवउद्योग आणि स्थानिक उद्योजकतेला चालना देणारे विविध उपक्रम भविष्यात राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. या माध्यमातून पालघर जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेचा विकास करून स्थानिक पातळीवर नव्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

#पालघर #पर्यटनदिन #आंतरराष्ट्रीयपर्यटनदिन #पालघरपर्यटन #NKCCA #दांडेकरमहाविद्यालय #पर्यटनविकास #उत्तरकोकण #TourismDay #NorthKonkanTourism #TourismReelCompetition #Palghar #NavyugPalghar








Leave Your Comments