पालघरला दुष्काळी जिल्हा जाहीर करा; खासदार डॉ. हेमंत सवरा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

Date: 2026-10-02
news-banner
नवयुग पालघर
***पालघरला दुष्काळी जिल्हा जाहीर करा; 
खासदार डॉ. हेमंत सवरा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी***

पालघर जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची प्रत्यक्ष परिस्थिती आणि पावसातील दीर्घ उघडीप लक्षात घेऊन जिल्ह्याचे फेरसर्वेक्षण करावे आणि पालघरला दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करावे, अशी मागणी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे.

खासदार डॉ. सवरा यांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना पालघर जिल्ह्यातील खरीप हंगामाची स्थिती निदर्शनास आणून दिली. राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश झालेला नाही. मात्र, दुष्काळ ठरवताना केवळ हंगामातील एकूण पर्जन्यमानाची आकडेवारी न पाहता पावसाचे वितरण, पिकांची सद्यस्थिती आणि पावसातील उघडीप यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा काही प्रमाणात अधिक पाऊस झाल्याचे दिसत असले, तरी त्यातील मोठा पाऊस जुलै महिन्यात झाल्यामुळे एकूण पर्जन्यमानाची आकडेवारी प्रत्यक्ष परिस्थितीचे योग्य चित्र दाखवत नसल्याचे खासदार सवरा यांनी पत्रात नमूद केले आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने भात पेरणीला विलंब झाला. त्यानंतर जुलैच्या पहिल्या दहा दिवसांत तसेच तिसऱ्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पर्जन्यमानाची एकूण आकडेवारी समाधानकारक दिसत असली, तरी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अनेक तालुक्यांमध्ये अत्यल्प पाऊस झाला. काही ठिकाणी या कालावधीत शून्य ते १० मिलिमीटरपेक्षाही कमी पावसाची नोंद झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

सध्या अनेक भागांत भाताची पिके हिरवीगार दिसत असली, तरी दाणा भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आवश्यक पाऊस न झाल्याने पिकांवर परिणाम झाला आहे. सप्टेंबरच्या मध्यापासून तापमानात वाढ झाल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून भात पीक धोक्यात आले असल्याचे पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील परिस्थितीवर लक्ष ठेवून बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा देण्याचे आश्वासन दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील खरीप पिकांची प्रत्यक्ष स्थिती आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने मारलेली उघडीप याचा पुन्हा आढावा घ्यावा, अशी मागणी खासदार डॉ. सवरा यांनी केली आहे.

पालघर जिल्ह्याचे फेरसर्वेक्षण करून प्रत्यक्ष पीकस्थितीचा विचार करावा आणि इतर दुष्काळग्रस्त जिल्ह्यांप्रमाणे पालघरचाही दुष्काळी जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

#पालघर #दुष्काळ #पालघरजिल्हा #शेतकरी #खरीपहंगाम #भातपीक #पर्जन्यमान #दुष्काळीक्षेत्र #हेमंतसवरा #मुख्यमंत्री #महाराष्ट्र #शेतकरीमदत #फेरसर्वेक्षण

Facebook / X / Instagram:
navyugpalghar.com

Leave Your Comments