मोखाड्यातील ग्रामपंचायत अधिकारी निलंबित; मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची कठोर कारवाई

Date: 2026-11-14
news-banner

मोखाड्यातील ग्रामपंचायत अधिकारी निलंबित; मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची कठोर कारवाई

कर्तव्यात कसूर, वरिष्ठांशी गैरवर्तन आणि प्रशासकीय कामकाजातील हलगर्जीपणाचे ठपके

पालघर, दि. ३ नोव्हेंबर २०२६ : मोखाडा तालुक्यातील धामणशेत ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर रामदास पाटील यांना कर्तव्यात कसूर, वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन आणि प्रशासकीय कामकाजात गंभीर हलगर्जीपणा केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी तात्काळ निलंबित केले आहे. पंचायत समिती मोखाड्याच्या गट विकास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

वरिष्ठांच्या आदेशांचा अवमान आणि गैरवर्तनाचे आरोप

ज्ञानेश्वर पाटील यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय महालेखाकार प्रलंबित मुद्दे निपटारा शिबिराला अनुपस्थित राहून वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणे, तसेच ग्रामविकास विभागाच्या २८ जानेवारी २०२५ रोजीच्या शासन निर्देशांचे उल्लंघन केल्याचे त्यांच्यावर आरोप आहेत.

पंचायत समिती स्तरावरील आढावा सभेत गट विकास अधिकाऱ्यांशी अरेरावी करणे आणि असभ्य भाषा वापरणे, अशा गैरवर्तनाच्या बाबीही अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायतीच्या कामकाजात गंभीर त्रुटी

निलंबनाच्या कारवाईमागे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजातील अनेक त्रुटींचाही उल्लेख आहे. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे :

  • आपत्ती व्यवस्थापन (कोरडा दुष्काळ) नियोजन सभेला अनुपस्थित राहणे.
  • ग्रामपंचायतीचे नमुना क्रमांक ०१ ते ३३ मधील दफ्तर अद्ययावत न ठे😢वणे आणि तपासणी अधिकाऱ्यांना ते उपलब्ध करून न देणे.
  • ग्रामस्थ आणि तक्रारदारांशी अरेरावीची भाषा वापरून अपमानास्पद वागणूक देणे.
  • ग्रामसभेचे कामकाज पूर्ण न करणे.
  • घरकुल योजनांची कामे अपूर्ण ठेवणे.

प्रशासकीय शिस्तीचा स्पष्ट संदेश

शासकीय सेवेत कर्तव्यपालन, प्रशासकीय शिस्त आणि वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे. कर्तव्यात कसूर, हलगर्जीपणा किंवा गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

Follow : Navyug Palghar | F • X • Instagram • YouTube
 navyugpalghar.com

#पालघर #मोखाडा #धामणशेत #जिल्हापरिषदपालघर #ज्ञानेश्वरपाटील #मनोजरानडे #निलंबन #प्रशासकीयकारवाई #NavyugPalghar

Leave Your Comments