पालघरमध्ये जनता दरबारातील तक्रारींवर कारवाईचा पत्ता नाही; निलेश सांबरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Date: 2026-11-14
news-banner
****पालघरमध्ये जनता दरबारातील तक्रारींवर कारवाईचा पत्ता नाही; निलेश सांबरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र****
**विराज प्रोफाइलमधील कामगारांच्या मृत्यूंची चौकशी, अवैध मटका-जुगार, पाणीपुरवठ्यातील अनियमितता आणि जिल्हा नियोजन निधीतील कथित गैरव्यवहारांबाबत कारवाईची मागणी**

बोईसर येथील विराज प्रोफाइल्स कंपनीतील मागील २० वर्षांतील कामगारांच्या मृत्यूंची चौकशी, पालघर जिल्ह्यातील अवैध मटका, जुगार, गुटखा व अमली पदार्थांचे व्यवसाय, ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यातील अनियमितता आणि जिल्हा नियोजन निधीतील कथित आर्थिक गैरव्यवहार, अशा चार गंभीर विषयांवर २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या जनता दरबारात तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करत निलेश सांबरे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी इंदुराणी जाखड यांना सविस्तर पत्र दिले आहे. पालकमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारात संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश देऊनही प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विराज प्रोफाइल्स कंपनीतील कामगारांच्या मृत्यूंचा गंभीर मुद्दा उपस्थित करत मागील २० वर्षांतील दुर्घटनांची घटनानिहाय माहिती संकलित करून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेतील त्रुटी, दुर्घटनांची कारणे तसेच प्रदीप सुखदेव जाधव यांच्या सुसाईड नोटमधील आरोपांची सखोल तपासणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

दुसऱ्या मुद्द्यात पालघर जिल्ह्यातील मटका, प्रतिबंधित गुटखा, अमली पदार्थ, अवैध दारू आणि जुगाराचे व्यवसाय यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेषतः बोईसर एमआयडीसी परिसरातील कथित अवैध धंद्यांना काही स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगनमत असल्याच्या तक्रारींची वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी. संबंधित पोलीस ठाण्यांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कारवाई करावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.

तिसऱ्या मुद्द्यात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही ग्रामीण आणि आदिवासी भागातील अनेक गावांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च, कामांची गुणवत्ता, कंत्राटदारांना दिलेली देयके आणि अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची स्वतंत्र तपासणी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

चौथ्या मुद्द्यात जिल्हा नियोजन समितीच्या विकासकामांमधील कथित आर्थिक गैरव्यवहार, निधी वितरण, जमीन हस्तांतरण आणि विविध परवानग्यांमधील अनियमिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे. संबंधित आर्थिक व्यवहार, अधिकृत कागदपत्रे आणि डिजिटल नोंदी तपासून निष्पक्ष चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या सर्व प्रकरणांची केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षक, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महसूल अधिकारी आणि संबंधित विभागप्रमुखांची विशेष बैठक तातडीने आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, २३ ऑक्टोबरच्या जनता दरबारात पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आजपर्यंत कोणत्या विभागाने काय कार्यवाही केली, किती चौकशा झाल्या आणि किती प्रकरणे प्रलंबित आहेत, याचा मुद्देनिहाय लेखी अहवाल देण्याची मागणीही करण्यात आली आहे. निवेदन प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांत प्राथमिक कार्यवाहीचा अहवाल आणि ३० दिवसांत चौकशी व कारवाईची सद्यस्थिती लेखी स्वरूपात सादर करावी, अशी स्पष्ट मुदतही पत्रातून देण्यात आली आहे.

यासंदर्भात आपली भूमिका मांडताना निलेश सांबरे यांनी म्हटले आहे की, पालघरच्या जनतेला आता केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष न्याय हवा आहे. जनता दरबारात पालकमंत्र्यांनी आदेश दिले, लेखी तक्रारी करण्यात आल्या आणि वारंवार प्रश्न उपस्थित केले, तरीही कारवाई होत नसेल तर या आदेशांना आणि तक्रारींना अर्थ काय? कामगारांच्या मृत्यूंच्या प्रकरणात न्याय मिळत नसेल, अवैध धंदे सुरूच राहत असतील, कोट्यवधी रुपये खर्चूनही गावांना पाणी मिळत नसेल आणि विकासनिधीतील कथित गैरव्यवहारांकडे दुर्लक्ष होत असेल, तर प्रशासनाने याचे उत्तर दिले पाहिजे.

दोषी कितीही मोठा किंवा प्रभावशाली असला तरी त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे. न्याय हा सर्वांसाठी समान असला पाहिजे. प्रशासनाने आपली जबाबदारी टाळून चालणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही संबंधित विभागांकडून कारवाई होत नसेल, तर प्रशासनाच्या उत्तरदायित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे पालघरमधील या चारही गंभीर तक्रारींवर जिल्हा प्रशासन आता काय भूमिका घेते आणि प्रत्यक्षात कोणती कारवाई करते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

navyugpalghar.com
Follow : Facebook | X | Instagram | YouTube
नवयुग पालघर – निर्भीड पत्रकारितेची अविरत वाटचाल!
#Palghar #NileshSambre #GaneshNaik #PalgharCollector #VirajProfiles #Boisar #PalgharNews #जनतादरबार #निलेशसांबरे #पालघर #नवयुगपालघर

Leave Your Comments