बालमजुरीविरोधात १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान जनजागृती सप्ताह;

Date: 2026-11-14
news-banner
***बालमजुरीविरोधात १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान जनजागृती सप्ताह; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नियोक्त्यांना कारावास आणि दंडाची तरतूद****

पालघर : बालमजुरी आढळल्यास संबंधितांनी तातडीने कामगार विभागाशी संपर्क साधावा, तसेच जिल्ह्यातील कोणत्याही आस्थापनात १४ वर्षांखालील बालकांना कामावर ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बालकांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षित बालपण अबाधित राखण्यासाठी पालघर जिल्ह्यात १४ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

या सप्ताहाच्या माध्यमातून बालमजुरीविरोधात व्यापक जनजागृती करण्यात येणार असून, दुकाने व आस्थापनांचे मालक, वीटभट्टी आणि खडीक्रशरचालक, हॉटेल व्यावसायिक, चहाच्या टपरीधारक, गॅरेज मालक तसेच बांधकाम क्षेत्रातील नियोक्त्यांनी बाल व किशोरवयीन कामगारांना कायद्याने प्रतिबंधित असलेल्या कामांवर नियुक्त करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भारतीय राज्यघटनेने प्रत्येक बालकाला शिक्षण आणि आरोग्याचा अधिकार दिला आहे. मात्र, बालमजुरीमुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहते आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे बालमजुरी ही केवळ कायद्याचे उल्लंघन करणारी बाब नसून गंभीर सामाजिक समस्या आहे. या अनिष्ट प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रशासनासोबतच समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.

बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ नुसार १४ वर्षांखालील बालकांना कोणत्याही व्यवसायात किंवा कामाच्या प्रक्रियेत रोजगार देण्यास प्रतिबंध आहे. तसेच १४ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व कामाच्या प्रक्रियांमध्ये रोजगार देणे हा दंडनीय गुन्हा आहे.

या कायद्याचे उल्लंघन करून बालकांना किंवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवणाऱ्या मालक अथवा नियोक्त्याला सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावास, २० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही आस्थापनात बालमजुरांची नियुक्ती करू नये, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
navyugpalghar.com
#बालमजुरीमुक्तभारत #बालहक्क #बालकामगार #जनजागृतीसप्ताह #बालकांचेभविष्य पालघर Palghar ChildLabour ChildRights StopChildLabour
F / X: @NavyugPalghar
Instagram: Navyug Palghar
YouTube: Navyug Palghar
नवयुग पालघर – निर्भीड पत्रकारितेची अविरत वाटचाल!

Leave Your Comments