नवयुग पालघर
****दांडेकर महाविद्यालयाच्या सुशांत सांगळेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड ; ४०० मीटर अडथळा शर्यतीत प्रथम****
३ ते ५ नोव्हेंबरदरम्यान पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत सोनोपंत दांडेकर कनिष्ठ महाविद्यालयातील सुशांत श्रीमंत पुष्पा सांगळे याने १७ वर्षांखालील मुलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे ही राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे.
विशेष म्हणजे, वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून कोणतीही कौटुंबिक क्रीडा पार्श्वभूमी नसताना सुशांतने मैदानी खेळाच्या सरावाला सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तो विनामूल्य व शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण घेत आहे. सातत्यपूर्ण सराव, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने टप्प्याटप्प्याने प्रगती करीत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविण्यापर्यंत मजल मारली आहे. सुशांत हा मनमिळावू स्वभावाचा, उत्कृष्ट संवादकौशल्य असलेला तसेच शैक्षणिक व अभ्यासेतर उपक्रमांमध्येही प्रावीण्य मिळविणारा हरहुन्नरी विद्यार्थी आहे. सध्या तो सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात अकरावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. या यशाच्या माध्यमातून त्याने आपल्या दिवंगत वडिलांना आपल्या कर्तृत्वाची अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सुशांतच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुरेश हसबे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, अॅथलेटिक्स ग्रुप ऑफ पालघरमधील सर्व खेळाडू व पालकांनी त्याचे अभिनंदन केले असून, राष्ट्रीय स्पर्धेतील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.