जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गणेश नाईक

Date: 2026-11-14
news-banner

नवयुग पालघर
****जिल्ह्याच्या विकासाला प्रथम प्राधान्य; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे – पालकमंत्री गणेश नाईक****
पालघर, दि. १३ नोव्हेंबर २०२६ : पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठाम भूमिका घेऊन काम करणार असून, जिल्ह्याच्या विकासालाच आपले प्रथम प्राधान्य असेल. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी आपापली जबाबदारी ओळखून समन्वयाने काम करावे, असे आवाहन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह २०२६’ अंतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना लाभवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक बोलत होते.

यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.

विकास प्रक्रियेत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगताना नाईक म्हणाले की, या सर्वांनी एकमेकांचे सहकारी म्हणून काम करणे आवश्यक आहे. एखाद्या यंत्रणेकडून किंवा व्यक्तीकडून काही त्रुटी झाल्यास त्यांच्यावर तातडीने टीका करण्याऐवजी प्रेमाने समजावून सांगून सकारात्मक मार्गदर्शन करावे. परस्पर सहकार्य आणि समन्वयातूनच विकासाला गती मिळू शकते.

नवी मुंबईला मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या यशाचा दाखला देताना त्यांनी महापौर, उपमहापौर, नगरसेवक, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, प्रभाग अधिकारी, शहर अभियंते, स्वयंसेवी संस्था तसेच प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाच्या प्रतिनिधींच्या सामूहिक योगदानाचे कौतुक केले. एखाद्या शहराच्या यशाचे श्रेय एका व्यक्तीला देता येत नाही. सर्वांनी आपापली जबाबदारी पार पाडत पहारेकऱ्याची भूमिका बजावल्यामुळेच हे यश मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे स्मरण करताना पालकमंत्री म्हणाले की, समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे स्मरण अनेक वर्षांनंतरही केले जाते. सुरुवातीला सामान्य असलेली व्यक्तीदेखील आपल्या कार्यकर्तृत्वातून मोठे व्यक्तिमत्त्व घडवू शकते. पालघर जिल्ह्यातूनही भविष्यात अशा प्रकारचे समाजसेवक निर्माण व्हावेत आणि त्यांच्या कार्याची समाजाने दखल घ्यावी, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

केंद्र व राज्य सरकार विकासाच्या दिशेने काम करत आहे. मात्र, राज्याची प्रगती केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कृतीतून आणि सर्वसामान्य नागरिकांना मिळणाऱ्या लाभातून दिसली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आणि संघर्षाचा वारसा जपत आदिवासी, वंचित आणि गरजू घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले.

दरम्यान, यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना लाभांचे वाटप करण्यात आले. तसेच बिबट्याच्या हल्ल्यांत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना २५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. 

#Palghar #GaneshNaik #JanajatiyaGaurav #BirsaMunda #PalgharDevelopment #TribalDevelopment #PalgharNews #NavyugPalghar
Follow : F | X | Instagram | YouTube
नवयुग पालघर – निर्भीड पत्रकारितेची अविरत वाटचाल!

Leave Your Comments