नवयुग पालघर
****५० जिल्हा परिषद शाळांतील २ हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप; मनरे फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम****
**गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ; पालघर तालुक्यातील ५० शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक किट**
पालघर : ग्रामीण आणि दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने मनरे फाऊंडेशनच्या वतीने पालघर तालुक्यातील ५० जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य व आवश्यक किटचे वाटप करण्यात आले. ४ नोव्हेंबर रोजी नागझरी (बोईसर) येथील रोहिणी बँक्वेट येथे हा उपक्रम उत्साहात पार पडला.
शाळेतील नियमित उपस्थिती राखणाऱ्या आणि शिक्षणाची जिद्द असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना या उपक्रमात प्राधान्य देण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्याने त्यांच्या शिक्षणातील अडचणी कमी होण्यास मदत होणार असून शाळेतील उपस्थिती आणि शिक्षणाची आवड वाढण्यासही प्रोत्साहन मिळणार आहे.
मनरे फाऊंडेशनच्या अध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पंचायत समिती पालघरचे गटशिक्षणाधिकारी, विविध जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक तसेच फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवणे, त्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संधी निर्माण करणे, या उद्देशाने मनरे फाऊंडेशनकडून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उपक्रम राबवले जातात.
navyugpalghar.com
Follow : F | X | Instagram | YouTube
#ManrayFoundation #Palghar #Education #शैक्षणिकसाहित्य #विद्यार्थी #जिल्हापरिषदशाळा #सामाजिकउपक्रम #NavyugPalghar