***मराठी भाषेत ९४ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण***

Date: 2026-06-26
news-banner
नवयुग पालघर 

***मराठी भाषेत ९४ हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण***


**//राज्य शिक्षण मंडळाच्या अलीकडील दहावीच्या परीक्षेत तब्बल ९४ हजार विद्यार्थी मराठी विषयात अनुत्तीर्ण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, प्रा. रमेश पानसे  यांनी मातृभाषाच शिक्षणाचे प्रभावी माध्यम असावे, या भूमिकेचा पुनरुच्चार करत सध्याच्या शिक्षणपद्धतीतील त्रुटींवर परखड भाष्य केले आहे. मराठी माध्यम, भाषिक पायाभूत शिक्षण आणि लहान वयात बहुभाषिक शिक्षणाच्या सक्तीमुळे निर्माण होणार्‍या अडचणींचा त्यांनी या लेखातून सखोल वेध घेतला आहे.//**



         प्रथम भाषा म्हणून मराठी विषयात उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.५७ टक्के आहे. सुमारे ७.४३ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. माझे लक्ष या मराठीत (म्हणजे स्वत:च्या मूळ भाषेत) अनुत्तीर्ण होणार्‍या, सुमारे  साडेसात टक्के विद्यार्थ्यांकडे अधिक केंद्रित होते आहे. कोण असतात ही मुले? का स्वत:च्या पहिल्या शिकलेल्या मराठी भाषेत अनुत्तीर्ण होतात? प्रश्न नेमकेपणाने उपस्थित झाले की उत्तराची वाट दिसू शकते, शोध घेता येतो. 
         -ज्यांची पहिली भाषा मराठी आहे, त्यांच्याबाबतीत मराठी भाषेशी सलगी होण्याच्या दोन पायर्‍या आढळतात. पहिली पायरी असते ती, भाषा निसर्गत: आपोआप आत्मसात होण्याची. साधारणपणे, जन्मोत्तर पहिल्या साडेतीन-चार वर्षापर्यंतचा काळ हा, भाषा ऐकायला मिळण्यापासून, तो थेट भाषा ऐकून समजणे, आणि समजत जाणारी शाब्दिक भाषा बोलता येणे इथपर्यंतच्या प्रगतीचा काळ असतो. बालकाला जन्मोत्तर जीवनासाठी भाषेचे आंदण निसर्गत: प्राप्त होते. यात बालकाचे प्रयत्न मर्यादित त्यांनी निसर्गाची किमया अधिक असते. हा  भाषा आपोआप येण्याचा कालावधी असतो; तो भाषा आवर्जून शिकण्याचा कालावधी नसतो; नसावा लागतो. 
          या लहान वयातील मुलांच्या भाषा शिकण्याच्या दोन पायर्‍या सर्रास आढळतात. पहिली पायरी भाषा नैसर्गिकरित्या आत्मसात होण्याची पायरी आणि दुसरी कृत्रिमरित्या भाषा शिकण्याची पायरी. पहिल्या पायरीनंतर दुसरी पायरी येते ती समाज  सहाय्यित अशी भाषा शिकण्याची पायरी. येथे पहिली आपोआप भाषा समजण्याची, बोलण्याची पायरी ही बहुतांशी निसर्गदत्त अशी असते; त्यात बालकाचे स्वत:चे प्रयत्न मर्यादित असतात. भाषा आजूबाजूच्या समाज गटाकडून बालकाकडे पोहोचत असते; बालक ती सहजतेने शोषून घेत असते. ती ‘त्याची’ भाषा होते. एकदा पहिली  भाषा बर्‍यापैकी आत्मसात झाली की, त्याच  भाषेच्या आधारे मुले ती भाषा ‘शिकू’ लागतात. भाषेचा  पसारा वाढत जातो, भाषेची समजही वाढीस लागते. थोड्याच काळात, मुले, भाषा ऐकणे, ऐकलेली भाषा समजणे, समजलेली भाषा बोलता येणे आणि बोललेली भाषा इतरांपर्यंत पोहोचणे या क्रिया घडून येतात.
        आपला प्रश्न आहे तो, अनेक मुले मराठी भाषेत उत्तीर्ण व्हावे इतपतही पोहोचत का नाहीत? त्यांच्या भाषा आत्मसात होण्याच्या प्रक्रियेत किंवा नंतरच्या भाषा आवर्जून शिकण्याच्या  प्रक्रियेत काही अडचणी उद्‌भवत असाव्यात. या अडचणीचा शोध घेणे, हा मूळ प्रश्न सोडविण्याचा एकमेव खात्रीचा मार्ग आहे, असे मला वाटते.
मुले (मोठ्या प्रमाणावर) मराठीत अनुत्तीर्ण होत आहेत याचा अर्थ, ढोबळ मनाने एकच आहे. तो म्हणजे मुलांना भाषेत जे आणि जितपत यायला हवे, ते आणि तितपत त्यांना येत नाही. आता या प्रश्नाच्या मुळाशी जायला हवे. शालेय पातळीवर या प्रश्नाकडे कसे पाहिले जाते? 
एक, मुलांना ‘समजत’च नाही
दोन, समजते पण ‘लक्षात’च राहत नाही
तीन, लक्षात येते, आठवते पण ते मांडता येत नाही 
चार, मुले त्यावर आपणहून कामच करत नाहीत (म्हणजे, समजून घेऊन, लक्षातच ठेवत नाहीत.किंवा,त्यांना समजावूनच घेता येत नाही. 
        आता इथे, विषयाला कलाटणी मिळतेय. आत्तापर्यंत आपण एका काल्पनिक बालकाविषयी किंवा मुलांविषयीच फक्त बोलत होतो. आता त्यात आणखी एका घटकाची, बालकाला ‘शिकविणा’र्‍या शिक्षिकेची भर पडत आहे. ही शिक्षिका त्याला मराठी विषय शिकवण्यासाठी नेमलेली आहे. (या शिक्षिकेला, विशिष्ट वयाच्या/ इयत्तेच्या मुलांना शिकवण्यासाठी लागणारा मराठी विषय पुरेसा येतोय, आणि चांगल्या तर्‍हेने शिकविता येतोय, असे गृहीत धरलेले आहे. जे ‘शिक्षिका’ म्हणून दीर्घकालासाठी आणि बर्‍यापैकी पगार देऊन, नेमली जाते, तिला किमान दोन गोष्टीची पात्रता आहे, असे गृहीत  धरले जाते. एक, शिक्षिकेला स्वत:ला पुरेसे मराठी येत आहे आणि, दोन, थेट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल, इतके नीट ‘शिकवता’ ही आहे येत आहे; एवढेच नव्हे तर ती, प्रामाणिकपणे, कष्ट घेऊन, आपल्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे कार्य करीत आहे. हे खरोखरच असे असेल, तर मुलांना (तिने शिकवलेले) मराठी येत नसण्याचा दोष, तिचा राहत नाही तर तो शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा असू शकतो. किंवा विद्याथ्र्याच्या न शिकण्याला अन्य काही परिस्थितीजन्य कारणेही असू शकतात. 
          बएक सर्वसामान्य नियम असा मानता येईल की शिकण्याच्या क्षेत्रात,  शिकणार्‍याची मानसिकता किंवा विशिष्ट वेळची मानसस्थिती, हा एक घटक, शिकावेसे वाटावे, यासाठी महत्त्वाचा आहे. 
             लहान मुलांच्या बाबतीत, काही वेळा असेही घडते की, त्यांना, दुसर्‍यांनी शिकवून शिकणे हे आवडते किंवा नावडते हे थोडेसे उपजत किंवा थोडेसे परिस्थितीजन्य असते. शिक्षक मारकुटा असल्याने, तो मुलांना आवडत नाही; आणि शिक्षक आवडत नाही म्हणून विषय आवडत नाही, आणि म्हणून शिकावेसे वाटत नाही. - अशा घटना माझ्या लहानपणी किंवा कुमारवयात फार मोठ्या प्रमाणावर दिसून येत असत. 
        मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेतच अनेक अडचणी उद्‌भवतात. बर्‍याच मुलांना सुरुवातीचे वाचनच कठीण जाते. शब्दांचे उच्चार नीट करता येत नाहीत. अक्षरे सुसंगत वाचता येत नाहीत;  त्यामुळे अक्षरगटाचे शब्दात रूपांतरच होत नाही. आणि शब्द पूर्णांशाने  समजल्याशिवाय शब्दार्थ निर्माण होत नाही; सारे वाचनच निरर्थक होऊन बसते.
        लिहिणे ही क्रिया गुंतागुंतीची असते. अक्षरांच्या जोडणींतून शब्दनिर्मिती होणे, ती अर्थपूर्ण असणे, शब्द अर्थासहित समजणे, अशा अर्थपूर्ण शब्दांच्या जोडणीतून वाक्यनिर्मिती होणे आणि शेवटी संपूर्ण वाक्य आकलनात येणे या सार्‍या पायर्‍या एकत्रितपणे समजणे, हे निदान सुरुवातीलाच अतिशय गुंतागुंतीचे वाटते. अक्षरांच्या जुडग्यातून शब्द निर्माण होणे आणि पुढे शब्दांच्या एकत्रिकरणांतून वाक्य घडणे तसेच ते संपूर्णच अर्थपूर्ण असणे, ही सारी भाषिक कसरत सहजपणे आणि अल्पवेळात जमने, मुलांना कठीण जाते.
         वाचन आणि लेखन ही दोन, भाषेतील मूलभूत कौशल्य आहेत. त्यातूनच पुढे, सरावांतून ऐकणे आणि बोलणे या क्षमता विकसित होत जातात, भाषिकदृष्ट्‌या आणि सामाजिकदृष्ट्‌याही.
         यासाठी, अर्थातच, मुलांना या विकासाच्या संधी प्राप्त होणे, गरजेचे असते; यासाठी, म्हणजे या सरावासाठी वेगवेगळ्या मुलांना, कमी-जास्त वेळ लागू शकतो, आणि तो त्यांना घेऊ द्यायचा असतो. या व्यवहारात मुलांच्या तुलना करायच्या नसतात.
         खरंतर, ह्या शिक्षणक्षेत्रातील ‘वेळ’ या विषयावर नव्याने विचार होण्याची गरज आहे. म्हणजे याच्यावर पूर्वी कधी सविस्तर विचार झाला आहे की नाही, ते मला माहित नाही. बहुदा राहून गेला आहे, असे वाटते. एक ओळखीचे उदाहरण घेऊ या. आपल्या शिक्षणातील सर्व परीक्षा ‘वेळा’त बांधलेल्या असतात. दोन तासांचा पेपर, किंवा तीन तासांचा पेपर, असा ठराविक वेळातच तो सोडवायचा असतो. का? एखाद्या मुलाला अधिक वेळ लागला. तर का देऊ नये? परीक्षा, प्रश्नोत्तरे येतात की नाही याची असते, की ठराविक  वेळेत ती किती लिहिता येतात याची असते? विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी आवश्यक तो वेळ दिला पाहिजे, तरच त्याला एकूण किती येते आहे हे तपासता येईल. विद्यार्थ्यांना कमी-जास्त वेळ लागू शकतो, आणि तो त्यांना मिळाला तरच त्याला किती येते आहे, हे ठरवता येईल. आपल्याला परीक्षा कशाची द्यायची आहे, हे नक्की ठरवायला हवे. किती वेळात लिहिले याची की किती बरोबर लिहिले याची? महत्त्व उत्तरांना आहे की वेळेला?
        रोजचे (आठवड्याचे) वेळापत्रक विषयांच्या शिकवण्यासाठी शाळा करतात. अंदाजे दैनंदिन वेळ विषयांवर विभागली जाते. सर्व विषयांना समान वेळ दिला जातो. तेव्हा कोणत्या विषयाला शिकवायला (किंवा समजून घ्यायला) किती वेळ नेमकेपणाने लागतो याचे मोजमाप कोणी केव्हा केले आहे? गणित, विज्ञानप्रयोग, मराठी आणि खेळ यांना समान वेळ (पस्तीस मिनिटांची तासिका) देऊन, कार्यभाग उरकता येतो काय?
         मुख्य मुद्दा हा आहे की जोवर शाळेचा एकूण वेळ वाढविला जात नाही तोवर त्यात नवे विषय आणता येणार नाहीत. प्रत्येक (घुसडलेला) नवा विषय आधीच्या विषयांना दिलेला वेळ कुरतडून घेणारच. भाषेचा आणि इतर  विषयांचाही असलेला वेळ कमी होणारच.
       बअलीकडे शालेय शिक्षणात उद्‌भवलेला प्रश्न असा आहे की पहिल्या इयत्तेतच मुलांवर तीन भाषा, एकाच वेळी, शिकण्याची सक्ती करणे इष्ट आहे का? या प्रश्नाचे माझे उत्तर ‘नाही’ असे आहे. कारण फक्त मराठी असेल तर भाषा शिक्षणासाठी योजलेला सर्वच वेळ मुलांना मराठीच्या सरावासाठी मिळेल. इंग्रजी तेथेच आणली की, भाषेचा म्हणून असलेला वेळ दोन भाषांत विभागला जाईल. प्रत्येक भाषेला निम्माच वेळ मिळेल, आणि तिसरी हिंदी भाषाही तिथे आणली तर प्रत्येक म्हणजे, मराठी, इंग्रजी आणि हिंदी यांना प्रत्येकी एक-तृतीयांश वेळ प्राप्त होईल. परिणामत: शिकण्याच्या सुरुवातीलाच सारा वेळ पहिल्या म्हणजे मराठी भाषेला देऊन, तिची पुढील शिक्षणासाठी पुरेशी तयारी होण्याऐवजी, तीनही भाषा कच्च्याच राहतील. म्हणजे एकूण शिक्षणाचा पायाच कच्चा राहिल. हेच नेमके आज, आपल्या प्राथमिक शाळेत घडले आहे; आणि त्यातून, मराठी विषयात ९४००० हजार विद्यार्थ्यांना नापास होण्यास व्यवस्थेने उद्युक्त केले आहे!

(लेखक रमेश पानसे हे डहाणू तालुक्यातील  ऐना येथील ग्राममंगलचे, संस्थापक व महाराष्ट्रातील एक अत्यंत आदरणीय ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि लेखक आहेत. ते बालशिक्षणाच्या क्षेत्रात, विशेषत: ग्रामीण आणि आदिवासी भागांत, भरीव  कार्य करित आहेत.)

Leave Your Comments